हिवरखेड लोणी रोडवरील पूल मोजतोय अखेरच्या घटका ! -शिकस्त पुलामुळे मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता

0
1066
Google search engine
Google search engine

 

गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष !

अपघाताला नीमंत्रण देणाऱ्या पुलामुळे संत्रा वाहतूक ठप्प !

४ महिन्यापासून एसटी बस सेवा बंद ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान !

 

रुपेश वाळके / मोर्शी – 

 

 

 

मोर्शी – वरुड या दोन तालुक्यांना जोडणारा हिवरखेड लोणी ग्रामीण रस्त्यातील ममदापुर गावाजवळील अपघाताला निमंत्रण देणारा धोकादायक पूल शेवटच्या घटका मोजत असून, अति धोकादायक स्थितीत असल्यामुळे मोर्शी आगराच्या बसेस जुलै महिन्यापासून बंद करण्यात आल्या आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होतांना दिसत आहे . या भागात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या शिकस्त पुलावरून संत्राची वाहतूक करण्यासाठी संत्रा भरून ट्रकद्वारे वाहतूक शक्य नसल्यामुळे अपघाताच्या भीतीपोटी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील आंबिया बहाराचा संत्रा शेतातच गळून पडत आहे त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे . तसेच त्या पुलाच्या दुरुस्ती अभावी रोजच हजारो ग्रामस्थांचा मृत्यूंच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार ? या अति धोकादायक पुलावरून अवजड वाहतूक सुरू आहे. पूल कोसळल्यास हिवरखेड लोणी गावचा संपर्क तुटल्यास ग्रामस्थांना दुसरा पर्यायी मार्ग नाही, त्यामुळे हा पूल तात्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

 

 

 

हिवरखेड लोणी गावाला जोडणाऱ्या रस्त्यातील नदीवरील पुलाचे दगडी बांधकाम खूपच जुने असून . या पुलाची एकही वेळा तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली नाही . या पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून, पुलाचा मधला बराच भाग खचला आहे. पूल कधीही कोसळून भीषण अपघात जीवित व वित्तहानी होण्याची शक्‍यता आहे.*

जीवघेण्या पुलावरून विध्यार्थी , कामगार, व्यावसायिक, शेतकरी , संत्राची वाहतूक , व ग्रामस्थांच्या दुचाकी व चारचाकींची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्ता खड्यात की खड्डा रस्त्यात हे कळायला मार्ग नाही , विद्यार्थी व ग्रामस्थ , शेतकरी जीव धोक्‍यात घालून ये-जा करतात करतांना दिसत आहे .

*या ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. आजारी व अपंग व्यक्तींची गैरसोय होत आहे. निवडणूक काळात केवळ पूल दुरुस्तीच्या व खड्डेमय रस्ते दुरुस्तीच्या घोषणाचे आश्‍वासन स्थानिक नेते देत होते , मात्र त्याचा फायदा होतांना दिसत नसून लोकप्रतिनिधी प्रति नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतांना दिसत आहे .

*हिवरखेड लोणी रोडवरील धोकादायक पुलाच्या सुरक्षेच्या धरतीवर या पुलाची केवळ प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात या पुलावरून अवजड वाहने जाण्यास मज्जाव केल्याचा सूचना फलक सुद्धा लावन्यात आलेले नसून पर्यायी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली नाही .सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वाहन चालकांकडे पर्यायी रस्ता नसल्यामुळे अवजड वाहनचालक दुर्लक्ष करत सर्रास वाहने नेतांना दिसत आहे . यामुळे दिवसेंदिवस या पुलाची अवस्था जीर्ण झाली असून, हा अति धोकादायक पूल कोसळून मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. शेवटच्या घटका मोजणाऱ्या या पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार ग्रामस्थ प्रशासनाकडे मागणी करत असून, केवळ त्यांच्या पदरी निराशा पडत आहे.*

*ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्‍त होत आहे. जीवित हानी झाल्यावरच पुलाची दुरुस्ती करणार का ? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. अति धोकादायक पुलाची व रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे एखादा अपघात झाल्यास मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन काय कार्यवाही करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे .*