कर्नाटक पोलिसांकडून करुणेश्‍वर मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी यांना अटक

0
563
Google search engine
Google search engine

जेवर्गी (कलबुर्गी) – एका मुसलमान युवकावर आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित केल्याच्या कथित आरोपावरून कर्नाटक पोलिसांनी जेवर्गी तालुक्यातील आंदोला येथील करुणेश्‍वर मठाचे मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी यांना ३० ऑक्टोबरला रात्री अटक केली. श्री सिद्धलिंगस्वामीजी हे श्रीराम सेनेचे राज्य कार्याध्यक्षही आहेत. स्वामीजींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून त्यांना कलबुर्गी केंद्र कारागृहात ठेवण्यात आले आहे. येथील एका महोत्सवाविषयी श्री सिद्धलिंगस्वामीजी हे ग्रामस्थांच्या सभेस उपस्थित असतांना पोलिसांनी मोठा फौजफाटा नेऊन त्यांना अटक केली. या वेळी ग्रामस्थ आणि भक्त आदींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

भक्तांकडून पोलिसांवर कथित आक्रमण केल्याचा आरोप पोलिसांनी केला. यामुळे पोलिसांनी भक्तांवर लाठीमार केल्याचे सांगण्यात येते. त्या वेळी स्वत: स्वामीजींनी सर्वांची समजूत काढली आणि त्यानंतर पोलिसांनी स्वामीजींना अटक केली.

काही दिवसांपूर्वी सरकारी जागा कह्यात घेऊन बांधलेली दुकाने रिकामी करतांना वाद निर्माण झाला होता. १६ दुकाने रिकामी करून अब्दुल खादर यलगार नावाच्या व्यक्तीचे दुकान थोडे मागे घेण्यात आले होते. या प्रकरणीही वाद झाला होता. यातून यलगार यांच्यावर आक्रमण झाले होते. या आक्रमणामागे स्वामीजींचा हात असल्याची तक्रार यलगार यांनी केली होती. या प्रकरणी स्वामीजींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. स्वामीजींना अटक करण्याच्या मागणीसाठी ‘सोशलिस्ट डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या अर्थात् (एस्.डी.पी.आय.च्या) कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेश मोडून मोर्चाही काढला होता. त्यामुळे पोलिसांनी एस्.डी.पी.आय.च्या २५० कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले. या सर्व प्रकारामुळे आंदोला येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. यानंतर पोलिसांनी एस्.डी.पी.आय.च्या दबावाला बळी पडत वरील कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.