तरुण पिढीने डेअरी व्यवसायामध्ये यावे. – दुग्धविकास मंत्री महादेव जानकर

0
1032
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –

 

 

डेअरी प्रकल्पांमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापर व्हावा तसेच डेअरी क्षेत्रामधील सुवर्णसंधींचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक तरुण पिढीने डेअरी व्यवसायामध्ये जावे असे आवाहन राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. नुकतेच ए.डी.एफ.आय. फोरम् – पुणे व बेनीझन मेडिया – करनाल, हरियाणा यांनी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय डेअरी इंडस्ट्री एक्स्पो या भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन जानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.

जानकर म्हणाले की, दुध उत्पादन व संकलन या व्यवसायामध्ये अनेक सुशिक्षित युवक कार्यरत असून हा युवक वर्ग प्रयोगशील असून त्याला डेअरी क्षेत्रामध्ये होत चाललेल्या सुधारणांबाबत कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येते. हा युवक आपल्यासोबत इतर युवकांनाही दुध व्यवसायाकडे येण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. डेअरी व्यवसायामधील या नवीन व्यावहारिक पिढीला त्याने उत्पादीत व संकलीत केलेल्या दुधाला योग्य दर व सुरक्षित बाजारपेठ हवी आहे. तो डेअरी व्यवसायामध्ये होत चाललेल्या विषयांवर बारीक लक्ष ठेऊन आहे. व त्यानुसार तो आपल्या व्यवसायाची पुढील दिशा ठरवीत आहे. महाराष्ट्रामधील दुध व्यवसायामध्ये अनेक स्थित्यंतरे होत आहेत. ही स्थित्यंतरे पाहता नजीकच्याच काळामध्ये एकंदरीत दुध व्यवसायावर याच लहान लहान दुध उत्पादक व संकलक यांचाच अंमल राहील असे स्पष्ट होते. स्थित्यंतराचे उदाहरण द्यायचे तर अहमदनगर जिल्ह्याचे देता येईल. अहमदनगर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ हा २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रामधील सर्वात जास्त म्हणजे ५ लाख लिटर्स दुध संकलन करणारा सहकारी दुध संघ होता. या संघाचे संचालकांनी आपआपल्या तालुका संघाची स्थापना करून जिल्ह्यात एकूण ७ तालुका संघ निर्माण केले. म्हणजेच ५ लाख लि. दुध या ७ तालुका संघामध्ये विभागले गेले. अल्पावधीमध्ये या सर्व तालुका संघाच्या संचालकांनी आपआपल्या विभागात स्वतःच्या मालकीच्या खाजगी डेअऱ्या सुरु केल्या म्हणजेच तालुका दुध संघाच्या संकलनाची विभागणी या नव्याने स्थापन झालेल्या डेअरी प्रकल्पांमध्ये झाली यामुळे ७ पैकी ५ तालुका संघ दुध संकलना अभावी बंद पडले. जे २ तालुका संघ चालू आहेत ते देखील दैनंदिन १० हजार लिटर्सच्या आत हाताळणी करीत आहेत. एवढ्यावरच हि प्रक्रिया थांबली नाही तर ज्या ज्या संचालकांनी आपल्या संबंधितांना दुध संकलन केंद्र उभारणीसाठी व दुध पुरवठा करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या सर्व दुध संकलन केंद्र चालकांनी आपआपली स्वतंत्र प्रक्रिया केंद्र सुरु केली व प्रत्येक गावामध्ये १ ते २ दुध संकलन एजंट नेमले. हे दुध संकलन एजंट बहुधा स्वतः दुध उत्पादकच असतात ते स्वतः च्या दुधसोबत गावामधील इतरांकडील दुध संकलन करून दैनंदिन २०० लि. ते १००० लि. दुध संकलन करून या लहान मोठ्या खाजगी प्रकल्पांना पुरवठा करीत आहेत. महाराष्ट्रातील शहरी बाजारपेठेसोबतच ग्रामीण बाजारपेठही दुध व दुग्धजन्य पदार्थांसाठी झपाट्याने समाधानकारकपणे विस्तारित असून बाजारपेठही विस्तारित आहे. ग्रामीण बाजारपेठेमध्येही दुध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढतच आहे म्हणून अनेक प्रस्थापित बँडस् नी ग्रामीण भागांमध्येही रिटेल आऊटलेटस् सुरु केलेली आहे. ग्रामीण यात्रा जत्रांमध्ये विविध पारंपरिक स्टॉल्स् सोबतच अमूलसारख्या डेअऱ्यांच्या दुग्धजन्य पदार्थांची यांच्या गाड्यादेखील सर्रास दिसू लागल्या आहेत. दुध उत्पादन स्वतः आपल्या दैनंदिन जेवणामध्ये विविध दुग्धजन्य पदार्थ, मिठाई यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर करू लागला आहे. म्हणूनच मध्यम लोकवस्तीच्या व बाजाराच्या गावांमध्ये मिठाईची दुकाने दिसून येतात. याचबरोबर पर्यटन फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे हायवे व मेनरोडवर हॉटेल्स्, ढाबे तसेच रिसॉर्ट्स यांचे प्रमाणही वाढलेले असून या ठिकाणी दुध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे. कोल्ड ड्रिंक्सच्या ऐवजी सुंधी दुध, लस्सी, जिरा ताक यांच्या सेवनाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेली आहे. म्हणजेच शहरी बाजारपेठेबरोबरच ग्रामीण बाजारपेठही विस्तारित आहे. म्हणूनच या दुध उत्पादक व संकलन प्रतिनिधींचा कल हा स्वतःचे दुध प्रक्रिया करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोच करण्याचा किंवा स्वतःच्या लहान मध्यम आकाराचा दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्रकल्प उभारण्याकडे वाढत असून हा युवा वर्ग यासाठी विविध प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊन प्रशिक्षण घेत आहे. जनावरांचे संगोपन, आदर्श गोठा व्यवस्थापन, लघु डेअरी फार्म व डेअरी प्रक्रिया प्रकल्प उभारणी, दुध प्रक्रिया तंत्रज्ञान, दुग्धजन्य पदार्थ उत्पादन, पॅकींग, साठवणूक गुणनियंत्रण, कोल्ड चेन, मार्केट रिसर्च, रिटेलिंग, ब्रँड इमेज डेव्हलपमेंट, शासकीय योजना, नियम याबाबत ही नवीन व्यावहारीक दृष्टीने अभ्यास करीत आहोत. ही अत्यंत समाधानकारक बाब असून यांमधूनच पारंपरिक गायीचा गोठा, डेअरी फार्म ते थेट ग्राहकांपर्यंत उत्पादन प्रक्रिया पुरवठा करणाऱ्या सारडा डेअरी फार्म, मॉडेलसारखे लहान लहान अनेक डेअरी प्रकल्प उदयास येत आहेत. या स्वागतार्ह स्थित्यंतरामुळे दुध उत्पादकाला कायमस्वरूपी स्थिर हमी भावापेक्षाही नफ्यासह किंमत मिळू शकेल, ग्रामीण युवकांना स्वयंरोजगार मिळू शकेल व याचबरोबर शहरी व निमशहरी ग्राहकाला खात्रीशीर चांगल्या गुणप्रतीची फ्रेश दुध व दुग्धजन्य उत्पादने मागणीनुसार घरपोहोच रास्त किंमतीमध्ये मिळू शकतील. या प्रदर्शनामध्ये दुभत्या जनावरांचे आरोग्य, न्यूट्रीशन, आदर्श गोठा व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मोफत कार्यशाळेचे आयोजन याच दिवशी करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये यशस्वी डेअरी फार्म उद्योजकांच्या यशोगाथा ऐकून त्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचीही संधी दुध व्यावसायिकांना मिळाली. या प्रदर्शनामध्ये देशभरामधून सर्व मशीनरी मॅन्युफॅक्चरर्स, डेअरी फार्म व डेअरी प्रकल्पधारकांसह सल्ला – मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी व मार्गदर्शकही फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते.

याप्रसंगी ‘फोरम’ चे चेअरमन आनंद गोरड व ‘बेनीझन मिडिया’ च्या प्राची अरोरा यांचेसोबत महाराष्ट्रामधील व देशभरामधील अनेक नामवंत डेअरी प्रकल्पधारक उपस्थित होते. यामध्ये ‘सोनाई डेअरी’ चे माने दादा, ‘स्वराज’ चे रणजितसिंह निंबाळकर, ‘कृष्णा दुध संघा’ चे विनायकराव पाटील, ‘कात्रज दुध संघा’ चे विष्णूकाका हिंगे, ‘चितळे डेअरी’ चे श्रीपादजी चितळे, माजी मंत्री राजेशजी टोपे, दुध महासंघाचे व्हा. चेअरमन पवार, ‘गोविंद’ चे जगताप, ‘प्रभात’ चे विवेक निर्मळ, ‘ऊर्जा’ चे प्रकाश कुतवळ, ‘कन्हैया’ चे मच्छिंद्र लंके, अरुण डेरे, ‘वैष्णव देवी’ चे अटल, काकाणी, ‘न्यू सिमला डेअरी’ चे परमार, ‘सकस’चे कदम, आबासाहेब थोरात हे आपल्या दुध उत्पादकांसोबत हजर होते. याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक आमदार हे देखील आपल्या कार्यक्षेत्रामधील दुध उत्पादकांसोबत हजर होते.