दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
1072
Google search engine
Google search engine
वर्धा-
दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. शासन पुन्हा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निसर्गाशी मैत्री करतोय. वॉटरशेडच्या माध्यमातून नैसर्गिक क्षमता पुनरुज्जीवित करण्यासाठी माथा ते पायथा काम करतोय. निसर्गाकडून घेतलेले निसर्गाला परत करण्यासाठी सावंगी पोड या आदिवासीबहुल गावातील गावकरी जी मेहनत घेत आहेत, त्यावरून पुढील 50 वर्षे या गावात दुष्काळ येणार नाही. मित्र म्हणून सरकार तुमच्यासोबत आहे. परिवर्तन घडत निसर्गाशी सर्वांची मैत्री झाली असून त्यातून दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करूया असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सावंगी पोड या गावात विविध विकास कामाची पाहणी आणि सामाजिक संघटनांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, माजी आमदार दादाराव केचे व सरपंच वर्षा धुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी संस्कृती अजूनही जिवंत आहे, याचे एकमेव कारण म्हणजे आदिवासी समाजाने निसर्गाचे शोषण नव्हे तर रक्षण केले आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वॉटर कप स्पर्धेत काम करणारे सर्वच नायक आहेत. पाणी हे जीवन आहे. या गावाने केलेली मेहनत येणाऱ्या पिढीसाठी सकारात्मक बिजारोपण करेल. सरकारच्या योजना या जनतेच्या होतात तेव्हाच त्या यशस्वी होतात. जलयुक्त शिवार ही अशीच लोकसहभागामुळे यशस्वी झालेली योजना आहे. ही सरकारची योजना नसून जनतेची आहे. यासाठी तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढेच सरकार तुमच्या पाठीशी उभे राहिल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
वॉटर कप स्पर्धेत 8 एप्रिल ते 4 मे 2017 या 27 दिवसांत 1 लाख 75 हजार घनमीटर पाणीसाठा होईल एवढी कामे झाली असून 5 मे ते 22 मे या कालावधीत होणाऱ्या कामातून 5 लाख घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. या कामातून 45 हजार मनुष्य दिवस काम अपेक्षित आहे. यशोदा नदी खोरे पुनरुज्जीवन अंतर्गत 630 किलोमीटर सरळीकरण व खोलीकरण होणार आहे. याचा फायदा 4 तालुक्यातील 143 गावातील 28 हजार शेतकरी कुटुंबाना होणार आहे.
यावेळी पाणी फांऊडेशनचे मंदार देशपांडे व उपस्थितांनी अन्न गुडगुडे, नाद गुडगुडे, दुष्काळ ढिस्कॅव ढिस्कॅव, जल है तो कल है, दुष्काळाला लाथ मारा, असे नारे देऊन वातावरण जोशमय केले. यावेळी जलसंधारणाच्या कामात योगदान देणाऱ्या दिलासा संस्थेचे रवींद्र तांदळकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मनीष बदे, रोटरी क्लब नागपूरचे मनीष भाटे, बजाज फाऊंडेशनचे महेंद्र फाटे, रोटरी क्लबचे डॉ. सचिन पावडे, ग्रामविकास अधिकारी बोबडे यांच्यासह विरुळच्या सरपंच साधना उईके यांनी सहा महिन्यांचे बाळ असताना काम केले त्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पांदण रस्‍ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्‍ते करण्‍यात आले. आर्वी तालुक्यातील पुनर्वसित 17 गावातील 4400 सातबारांचे प्रातिनिधिक स्वरूपात विनोद खांडेकर नेरी, भीमराव तुमस्कर, भावराव कोरे यांना वाटप करण्यात आले.