भंडारा जिल्हा हागणदारीमुक्त घोषित —जिल्हयात 4 वर्षात 86 हजार वैयक्तिक शौचालय पूर्ण

0
484
Google search engine
Google search engine

• ओ.डी. एफ. प्लसच्या दिशेने जिल्हयाचे वाटचाल

भंडारा :-

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत संपूर्ण देश हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सरकारने कार्यक्रम तयार केला असून सन 2016-17 मध्ये 10 जिल्हयाची निवड केली असून यात भंडारा जिल्हयाचा समावेश आहे. जिल्हयात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चार वर्षात 86 हजार 1 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून ओ.डी. एफ. प्लसच्या दिशेने जिल्हयाचे वाटचाल सुरु झाली आहे. दिलेला लक्षांक निर्धारित वेळेत पूर्ण करुन जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 2012 मध्ये करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार भंडारा जिल्हयाची एकूण कुटूंब संख्या 2 लाख 7 हजार 626 एवढी आहे. त्यापैकी 1 लाख 21 हजार 625 कुटूंबाकडे 2012 पूर्वी वैयक्तिक शौचालय होते. त्यामुळे उर्वरित 86 हजार 1 कुटूंबाकडे वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्टय जिल्हयाला प्राप्त झाले होते. हे उद्दिष्टय जिल्हयाने निर्धारित 4 वर्षात पूर्ण केले आहे. सन 2013-14 मध्ये 6 हजार 306, सन 2014-15 9 हजार 560, सन 2015-16 मध्ये 13 हजार 217 व सन 21016-17 मध्ये 56 हजार 918 असे एकूण 86 हजार 1 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. प्राप्त लक्षांक भंडारा जिल्हयाने निर्धारित वेळेत गाठून पायाभूत सर्वेक्षणानुसार जिल्हा हागणदारी मुक्त केला आहे.

भंडारा-11 हजार 251, लाखांदूर-8 हजार 468, लाखनी-11 हजार 583, मोहाडी-15 हजार 25, पवनी-8 हजार 282, साकोली- 13 हजार 481 व तुमसर -17 हजार 911 असे तालुका निहाय वैयक्तिक शौचालय उभारण्यात आली आहेत. या नंतर जिल्हयात 2 लाख 7 हजार 626 कुटूंबाकडे वैयक्तिक शौचालय झाली आहेत. वरील प्रमाणे तालुकानिहाय वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून बांधकाम झालेल्या संपूर्ण शौचालयाचे मोबाईल ॲपद्वारे 100 टक्के फोटो अपलोड करण्यात आले आहेत. सद्या जिल्हयात ओडीएफ प्लसच्या दृष्टीने कामकाज सुरु असून ना दुरुस्त शौचालयाचे बांधकाम व बांधकाम झालेल्या शौचालयाच्या वापराकरीता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद भंडारा यांचेकडून गावागावात विशेष उपक्रम राबविले जात आहेत.
संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीने पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने कृती आराखडा तयार करुन योग्य पध्दतीने अंमलबजावणी केली. गावकऱ्यांच्या भागीदारीने व प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे भंडारा जिल्हा हागणदारी मुक्त होऊ शकला. ग्रामीण भागात आजही बऱ्याच ठिकाणी उघडयावर शौचास जाण्याची पध्दत आहे. मात्र स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत प्रत्येक कुटूंबासाठी शौचालय बांधून देण्याची योजना असल्यामुळे अनेक खेडे हागणदारी मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्वच्छ भारत आवाहनानुसार भंडारा जिल्हयात वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण करुन जिल्हा हागणदारीमुकत करण्यात आला आहे. एवढयावरच थांबणार नसून जिल्हयाची वाटचाल आता ओडीएफ प्लसच्या दिशेने सुरु आहे. या सोबतच नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हयाचे हे स्थान कायम ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. – मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी