नवीन माध्यमांचे मोठे आव्हान — जगदिश मिणियार

0
1713
Google search engine
Google search engine

हिंगोली :-

पत्रकारिता हे लोकशिक्षण व समाजशिक्षणाचे महत्वाचे माध्यम असून पूर्वीही ते होते नी आज ही आहे आणि उद्याही राहणार आहे. परंतू आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात बदललेल्या नवीन माध्यमांचे त्यांच्यापूढे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने आयोजित ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यासह डॉ. विजय निलावार, प्रद्युम्न गिरीकर, राकेश भट, नजीर अहमद, प्रल्ह शिंदे आणि प्रकाश इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे श्री. मिणियार म्हणाले की, मागील काही काळात सोशल मीडिया हा जास्त प्रभावी ठरला आहे. वृत्तपत्र वा वृत्त वाहिन्या ऐवजी फेसबुक, टि्वटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम या माध्यमातून व्यक्त होणे सुरू झाले आहे. त्याउलट फार तातडीने मजकुराची देवाण-घेवाण होत आहे. टि्वट केल्यावर लागलीच जगातील कुठल्याही भागात ते पोहोचलेले असते. एवढी गतिमानता अन्य कोणत्याही प्रसिध्दी माध्यमात नाही. हे मोठे आव्हान पारंपारिक माध्यमासमोर आहेत. परंतू त्यावर प्रसारित होणारा मजकुर विश्वसनीय असल्याबाबत नेहमी साशंकता असते.
समाजात काय वास्तविक परिस्थिती चालू आहे, सर्वसामान्यांचे सरकारच्या निर्णयावर काय मत आहे ? हे जाणून घेणे कोणत्याही निपक्षपातीपणे काम करणाऱ्या प्रसारमाध्यमांचे कर्तव्य असते आणि ते कर्तव्यच पार पाडण्याचे काम प्रसारमाध्यमे करत असतात. प्रिंट मीडियाची विश्वसार्हता अबाधीत आहे. परंतू त्यांच्या समोर आता इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि आजच्या आधुनिक काळातील सोशल मिडियाचे मोठे आव्हान आहे. परंतू हि माध्यमे प्रिंट मीडियाला आव्हान ठरू शकेल काय अशी चर्चा सुरू आहे.

आता प्रिंट मीडिया संपणार. कालबाह्य होणार असा विचारप्रवाह देखील सुरू झाला. पण इलेक्ट्रॉनिक आणि सोशल माध्यमांचा प्रभाव जरूर वाढला. मात्र हि माध्यमे प्रिंट माध्यमाला पर्याय ठरू शकले नाही आणि भविष्यात ठरणार हि नाहीत. याचे कारण जनमानसाच्या मनावर प्रिंट मीडियाची अधोरेखित झालेली विश्वसनीयता होय. आजही छापून आले आहे यावर वाचकांचा जास्त विश्वास आहे. तो विश्वास या नवीन माध्यमाला आजवरही संपादन करता आलेला दिसून येत नाही. विशेषत: ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात तर घाईगर्दीमुळे बातम्यांची खातरजमा करणे या माध्यमाला साधत नाही. शिवाय आपल्या झालेल्या चुकांबद्दल नंतर खुलासा करणे, स्पष्टीकरण देणे यालाही या माध्यमातून आजवर स्थान मिळालेले नाही. असे हि श्री. मिणियार यावेळी म्हणाले.
यावेळी पत्रकार राकेश भट, नजीर अहमद, डॉ. विजय निलावार यांचीही समयोचित भाषणे झाली. श्री. भट यांनी चांगला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची आव्हाने वेगळी आहेत परंतू या परिस्थितीत ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पत्रकारिता करावी, असे सांगितले. माध्यमे हे समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे नजिर अहमद म्हणाले. डॉ. निलावार यांनी सामाजिक प्रश्नासह इतर विषयांसंबंधी पत्रकार हे समाजासमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न करीत असतात. पत्रकारीता करतांना माध्यमांना अनेक आव्हानाचा सामना करावा लागतो असे मत मांडले.
राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्व विशद करतांना प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी म्हणाले की, वृत्तपत्र स्वातंत्र्याची आणि पत्रकारितेतील वृत्तपत्र स्वातंत्र्याची जपणूक होऊन पत्रकारीतेतील उच्च मुल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची 16 नोव्हेंबर, 1966 रोजी स्थापन करण्यात आली. यानिमित्त सन 1997 पासुन दरवर्षी 16 नोव्हेंबर हा प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचा स्थापना दिवस ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ म्हणुन देशभर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने दरवर्षी प्रेस कॉन्सिल मार्फत एक विषय निश्चित करण्यात येऊन त्या विषयावर व्याख्याने, परिसंवादाचे आयेाजन करण्यात येते. यावर्षी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियामार्फत ‘माध्यमा समोरील आव्हाने’ हा विषय निवडण्यात आला आहे.
सुरूवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास दिलीप हाळदे, विलास जोशी, ज्ञानेश्वर लोंढे, विष्णु धामणे, श्याम सोळंके, श्रीरंग सिरसाट, विजय गुंडेकर, कैलास शिखरे, बबनराव डाखोरे, रेखाताई सरोदे, सुनिल पाठक, सुधाकर वाढवे, सुरेश पाईकराव, वंदना कांबळे, आनंद घनघाव, यु. एच. बलखंडे, रवी शिखरे, नागोराव जांबुतकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल चव्हाण, श्रीमती बंडगर आणि अशोक बोर्डे यांनी सहकार्य केले