समाज परिवर्तनात माध्यमांचे योगदान महत्वपूर्ण – प्रा.बबन मेश्राम >●<<>● राष्ट्रीय प्रेस दिन साजरा

0
926
Google search engine
Google search engine

गोंदिया :-

पत्रकार हा नीतीमूल्य जपणारा व्यक्ती आहे. नवपरिवर्तनाचे काम करतांना तो जनसामान्यांना न्याय देण्यासाठी झटत आहे. वाईट चालीरिती, अनिष्ठ रुढी, परंपरा यावर प्रसारमाध्यमातून प्रहार करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या समाज परिवर्तनात माध्यमांचे योगदान महत्वपूर्ण आहे. असे प्रतिपादन प्रा.बबन मेश्राम यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने 16 नोव्हेंबर रोजी भारतीय प्रेस परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमीत्त राष्ट्रीय प्रेस दिनाचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर मुख्य वक्ते म्हणून प्रा.मेश्राम बोलत होते. प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार प्रा. एच.एच.पारधी, गोपाल अग्रवाल व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.

प्रा.मेश्राम म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात मोठा फरक आहे. आजची पत्रकारिता ही व्यवसायाकडे वळत आहे. मालकाचा उद्देश हा भांडवली असला तरी त्याच्याकडे काम करणारा पत्रकार हा समाज परिवर्तनाचे काम करीत आहे. पत्रकारितेतून सामाजिकीकरण होत आहे. नवपरिवर्तन करतांना सांस्कृतिक मुल्ये देखील पत्रकारांनी जपली पाहिजे. आज आपण जीवनमुल्ये विसरलो असल्याचे त्यांनी सांगितले.
नविन विचार व नविन विचारमुल्ये आज तयार होत असल्याचे सांगून प्रा.मेश्राम म्हणाले, आधुनिक युगातील समाजात देखील विचारमुल्ये रुजविण्याची गरज आहे. मनुष्याचे आचारविचार देखील बदलले पाहिजे. नविन पत्राकारिता ही उदयास आली पाहिजे. सौंदर्य शास्त्राचा वापर देखील पत्रकारितेमध्ये झाला पाहिजे. वृत्तपत्रे ही चांगल्या दर्जाचे लिखाण करणारी असली पाहिजे कारण ती लोकशाहीचा आत्मा आहे. वृत्तपत्रातून करण्यात येणारे लिखाण सकारात्मक असले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
माध्यमांपुढे आर्थिक, सामाजिक व शासकीय आव्हानेसुध्दा असल्याचे सांगून प्रा.मेश्राम म्हणाले, समाज परिवर्तनासाठी काम करणारा पत्रकार हा स्वत:कडे दुर्लक्ष करतो. तो सुदृढ रहावा यासाठी त्याने आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. वर्तमानपत्रे ही समाजमनाचा आरसा आहे. दिवसेंदिवस पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना होत आहे. हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. माणुसकी जपणे देखील पत्रकारिता क्षेत्रात महत्वाचे आहे. समाज प्रबोधनाचे काम करीत असतांना सत्यनिष्ठा, अचुकता व वस्तुनिष्ठतेतून पत्रकाराने लिखाण केले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा.पारधी म्हणाले, मागील काही वर्षापासून माध्यमांचे महत्व कमी होत असल्यामुळे त्यांच्यापुढील आव्हाने वाढले आहे. इलेक्ट्रॉनिक मिडिया टीव्हीच्या माध्यमातून घरोघरी लोकांच्या मनावर राज्य करीत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबत सोशल मिडिया देखील आला आहे. तरीसुध्दा माध्यम म्हणून वृत्तपत्रांचे महत्व अबाधित आहे. सोशल मिडियातून फेक बातम्या देण्यात येत असल्यामुळे त्यांची विश्वसनीयता कमी आहे. वृत्तपत्रांची विश्वसनीयता आजही कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
आज अनेक वृत्तपत्र बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगून श्री.पारधी म्हणाले, वृत्तपत्राला राजाश्रय मिळण्याची आवश्यकता आहे. माध्यमांची भूमिका समाज हितासाठी महत्वाची आहे. वृत्तपत्रांमध्ये स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर सत्तेचे पाठबळ आवश्यक आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधी हा समाजातील दुर्लक्षीत घटक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.अग्रवाल म्हणाले, वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मिडिया ही प्रमुख माध्यमे आहेत. सर्वात जूने माध्यम म्हणून वृत्तपत्राकडे बघितले जाते. या तिनही माध्यमांसमोर आज आव्हाने आहेत. त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा सुध्दा आहे. प्रतिस्पर्धेमधून सुधारणेला संधी देखील आहे. वृत्तपत्रे कुणालाही काढता येतात. मात्र इलेक्ट्रॉनिक मिडिया हा उद्योजकांच्या हाती आहे. तरीदेखील वृत्तपत्राचे महत्व अबाधितच आहे. वृत्तपत्रांचे मालक दिवसेंदिवस श्रीमंत होत असतांना मात्र तेथे काम करणारा पत्रकार हा आहे त्याच स्थितीत असल्याचे सांगितले.
पत्रकारिता करण्यासाठी वेळेचे बंधन नसल्याचे सांगून श्री.अग्रवाल म्हणाले, 24 तास तो पत्रकारिता करतो पण त्या मोबदल्यात त्याला पैसा कमी मिळतो. पत्रकारांनी आपल्या मागण्यांसाठी शासनावर व वृत्तपत्रांच्या मालकांवर दबाव आणला पाहिजे. तरच पत्रकारांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय प्रेस दिनाच्या या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, हिदायत शेख, खेमेंद्र कटरे, संजय राऊत, नविन अग्रवाल, हरीश मोटघरे, अतुल दुबे, रवि आर्य, उदय चक्रधर, जयंत शुक्ला, मुनेश्वर कुकडे, मुकेश शर्मा, चंद्रकांत खंडेलवाल, देवानंद शहारे, नरेश सिंद्रामे, महेंद्र बिसेन, बिरला गणवीर, भरत घासले, मोहनचंद्र पवार, महेंद्र माने, राजेश बन्सोड आदी प्रसारमाध्यम प्रतिनिधींची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. उपस्थितांचे आभार जयंत शुक्ला यांनी मानले.