शेतकऱ्यांचे कैवारी म्हणविणाऱ्या लोकप्रतिनीधींना पडला शेतकऱ्यांचा विसर – बोंडअळीच्या हल्ल्याने शेतकरी हवालदिल

0
1019
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

आधीच सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली कर्जमाफी आयटी विभागाच्या जंजाळात रुतून बसली आहे. त्यात आता कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्याने शेतकऱ्यांना होत्याचे नव्हते करून टाकले. चांदुर रेल्वे तालुक्यातील बोंडअळीमुळे कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले असुन शेतकरी पीकावर थेट ट्रॅक्टर फिरवीत आहे. शेतकऱ्यांची इतकी वाईट परीस्थिती झाली असतांनासुध्दा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणविणाऱ्या लोकप्रतिनीधींना साधी एक भेट घेण्यासाठी वेळ नसल्याचे दिसुन येत आहे.

चांदुर रेल्वे तालुक्यात कापसाचे पीक यंदा संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. बीटी कॉटनचे बियाणे पेरल्यानंतर रोपाची वाढ उत्तम झाली, हिरवीगार टपोरी बोंडेही आली; मात्र बाहेरून टणक आणि अखंड दिसणाऱ्या कापसाच्या प्रत्येक बोंडात गुलाबी बोंडअळी शिरलेली होती. बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीच्या किडीने यावर्षी असे काही आक्रमण केले की, कापसाच्या लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे कठीण झाले. बोंडअळीच्या रोगाने बरबटलेल्या कापसाच्या उभ्या शेतावर नांगर, रोटावेटर चालवून शेतकरी ही रोपे मोडून टाकत आहेत. या संकटामुळे कापसाचे पीक तर शेतकऱ्यांच्या हातून गेलेच; मात्र ज्या कापसाच्या रोख पैशांवर कुटुंबाची गुजराण व्हायची ती आता कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सातत्याने अडचणीत असलेला शेतकरी यंदा कापसावरील बोंडअळीच्या हल्ल्याने अक्षरशः कोलमडून गेला आहे, हवालदिल झाला आहे. खायचे काय आणि वर्षभर कुटुंबकबिल्याचे पालनपोषण कसे करायचे या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. तालुक्यासह विदर्भातील शेतकरी अशा बिकट परिस्थितीत सापडला असताना सरकार पातळीवर मात्र सारीच सामसूम दिसते आहे. तालुक्यातील येरड येथील देशमुख व मांडवा येथील इंगोलसह अनेक शेतकऱ्यांनी शेतात उभ्या कपासीच्या पीकावर ट्रॅक्टर फिरवीले. वृत्तपत्रांमधुन याबाबतचे वृत्त सुध्दा आले. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी लोकप्रतिनीधी शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेले नसल्याचे समजते. परंतु मांडवा गावातील इंगोले नामक शेतकऱ्याकडे केवळ नागपुर येथील आम आदमी पक्षाच्या दोन नेत्यांनी भेट दिल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्यात मतांचा जोगवा मागण्यासाठी लोकप्रतिनीधी न चुकता प्रत्येक गावागावात जातात. परंतु शेतकरीवर्ग देशोधडीला लागला असतांना मात्र लोकप्रतिनीधींनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली आहे.