साश्रू नयनांनी मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना अखेरचा निरोप – हजारो नागरिकांची उपस्थिती

0
1678
Google search engine
Google search engine

• पवनी येथे शासकीय इतमामात अंत्य संस्कार
• ‎मेजर प्रफुल्ल अमर रहे च्या घोषणांनी आसमंत दणाणला

भंडारा :- काश्मीरच्या राजोरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पवनीचा सुपूत्र मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर (32) हे शहिद झाले. या वीर पुत्राला पवनी येथील वैजेश्वर मोक्षधाम येथे हजारोंच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मेजर प्रफुल्ल यांच्यावर शासकीय इतमामात रविवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. प्रफुल्ल यांचे काका युवराज मोहरकर यांनी पार्थिवास मुखाग्नी दिला. यावेळी प्रफुल्ल यांचे आई, वडील, पत्नी, नातेवाईक व पवनी वासियांना अश्रू अनावर झाले होते.

तत्पूर्वी शहिद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचे पार्थिव भारतीय वायूसेनेच्या विमानाने नागपूरच्या सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर पार्थिव पवनी येथे आणण्यात आले. शहीद मेजर प्रफुल्ल यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने पवनीवासीय उपस्थित होते. ‎वैजेश्वर मोक्षधाम येथे कर्नल सवित खन्ना, कर्नल शिवाजी, मेजर मनिष, कॅप्टन भारद्वाज यांनी लष्कराच्या वतीने मेजर प्रफुल्ल यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण केले व मानवंदना दिली. त्यानंतर‎ सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार डॉ. परिणय फुके, रामचंद्र अवसरे,चरण वाघमारे, बाळा काशिवार, नगराध्यक्षा पूनम काटेखाये, माजी खासदार नाना पटोले, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी बी. पी. पृथ्वीराज, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नितीन पांडे, तहसीलदार गजानन कोकड्डे, मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अखेरचे दर्शन घेतले.

‎यानंतर मेजर प्रफुल्ल यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. या ठिकाणी लष्करी अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली. याप्रसंगी मेजर प्रफुल्ल यांचे वडील अंबादास मोहरकर, आई सुधाताई मोहरकर, पत्नी अबोली मोहरकर, मेजर अभिषेक, काका युवराज मोहरकर व आप्त यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला.
‎ मोहरकर परिवार मूळचे पवनी तालुक्यातील जुनोना येथील रहिवासी असून अंबादास मोहरकर हे वलनी येथील महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक होते. सेवा निवृत्तीनंतर पवनी येथील भाई तलाव वार्डात घर बांधून ते स्थायिक झाले. मेजर प्रफुल्ल यांची आई सुधाताई या शिक्षिका असून मोठा मुलगा प्रफुल्ल मेजर तर लहान मुलगा पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरीला आहे. प्रफुल्ल यांचे २४ डिसेंबर २०१३ रोजी अबोली शिंदे यांचे सोबत लग्न झाले. 24 तारखेला त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता परंतु आदल्या दिवशीच प्रफुल्ल यांना वीर मरण आले. सैन्य दलात मेजर या पदावर पोहचणारे ते पवनी तालुक्यातील ते पहिले होते. ‎प्रफुल्ल यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मानोरी व पूर्व माध्यमिक शिक्षण तास ता. भिवापूर येथे झाले. नागपूर येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला प्रवेश मिळाल्यानंतर एनडीएची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी मिलिटरी अभियांत्रिकी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. डेहराडून व खडकवासला पुणे येथे शिक्षण पूर्ण करून राहुरी येथे लेफ्टनंट पदावर ते रुजू झाले. त्यानंतर अल्पावधीतच ते मेजर या पदावर पोचले. मेजर म्हणून सीमावर्ती भागात टेहळणी करीत असतांना पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात त्यांना वीरगती प्राप्त झाली.

पवनी न.प.चे प्रशंसनिय कार्य शहीद मेजर प्रफुल्ल यांचा अंत्य संस्कार पवनी येथील ज्या वैजेश्वर घाटावर करण्यात आला तो घाट स्वच्छ करण्याची जबाबदारी पवनी नगर पालिकेने पार पाडली. नगराध्यक्षा पुनम काटेखाये व मुखाधिकारी माधुरी मडावी हे कार्य तत्परतेने पार पाडले. पवनीच्या सुपत्राच्या अखेरच्या स्वागतासाठी शहरवासियांनी आपापल्या घरासमोर रांगोळ्या काढून व मेणबत्ती लावून सजावट केली होती.
मेजर प्रफुल्ल यांचे पार्थिव खुल्या ट्रॅक्टर मध्ये ठेऊन गावकऱ्यांनी त्यांची शहरातून मिरवणूक काढली. शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर अमर रहे च्या घोषणांनी यावेळी आसमंत दणाणला होता.