घुईखेड येथील शौचालय अनुदान वाटपात घोटाळा पत्रपरीषदेत घुईखेडवासीयांचा आरोप

395
जाहिरात

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)  

 

तालुक्यातील घुईखेड येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय अनुदान वाटपात चांदुर रेल्वे पंचायत समिती व ग्रामपंचायत, घुईखेड यांनी मोठा घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप घुईखेड ग्रामवासीयांना स्थानिक विश्रामगृह येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत केला.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधता यावे याकरीता शासनाच्या वतीने १२ हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देऊन ग्रामिण भाग हागणदारी मुक्त करण्याचा एका मोठा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येत असतांना चांदुर रेल्वे तालुक्यातील घुईखेड ग्रामपंचायतने चक्क मृत लोकांच्या नावे अनुदान काढुन मोठा घोटाळा केल्याचा आरोप घुईखेड येथील डॉ. हेमंत जाधव यांनी केला. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, एकाच कुटुंबातील ४ व्यक्तींना अनुदान देऊन लाखो रूपये हडपले तर काही ठिकाणी थातुरमातुर शौचालय बांधुन अनुदान लाटण्याचा प्रकार केल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. अनिल वानखडे यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, घुईखेड ग्रामपंचायतकडुन ६०६ अधिक ५७ लाभार्थ्यांची यादी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात दिली. तर चांदुर रेलेवे पंचायत समितीकडुन १५/८/२०१७ रोजी ५७८ लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली. या दोन्ही यादींचा कुठेही ताळमेळ लागत नाही. तसेच त्यामध्ये बऱ्याच आक्षेपार्ह गोष्टीही निदर्शनास आल्यामुळे आम्ही पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करून चौकशीची मागणी केली. या तक्रारीवरून वरिष्ठांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार चांदुर रेल्वे पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी प्रत्यक्ष घुईखेड ग्रामपंचायतमध्ये जावुन केवळ मोका पाहणी केली. मात्र अद्यापही त्या चौकशीचा अहवाल देण्यात आलेला नाही.
चांदुर रेल्वे पंचायत समितीच्या कॅशबुक प्रमाणे ३१९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. मात्र त्यामधील चक्क ३४ लाभार्थ्यांची नावेच बेपत्ता आहे. तर ग्रामपंचायत माध्यमातुन कोणत्या २५० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला हे स्पष्टच होत नाही. ग्रामपंचायतच्या व्हाऊचरमध्ये एका लाभार्थ्याला अर्धाच लाभ (६००० रूपये) देण्यात आला. तर पं. स. व घुईखेड ग्रा. पं. च्या संयुक्त लाभार्थ्यांच्या यादीत ६४ लाभार्थ्यांची नावेच सापडत नाही. पंचायत समितीने २५० लाभार्थ्यांचे १२ हजार रूपये प्रमाणे ३० लाख रूपये घुईखेड ग्रा. पं. ला दिले. प्रत्यक्षात घुईखेड ग्रा. पं. च्या कॅशबुकनुसार २३६ लाभार्थ्यांना १२ हजार प्रमाणे व एकाला सहा हजार रूपये असे एकुन २८ लाख ३८ हजार रूपयाची रक्कम अदा केल्याचे दिसते. कॅशबुकच्या व्यवहारामध्ये १ लाख ४३ हजार ११५ रूपयांचा फरक दिसुन येतो. सदर रक्कम कोणाला दिली हे ही स्पष्ट होत नाही. घुईखेड येथील बबन टेके व दशरथ चिंचोळकर यांच्या नावाने घुईखेड पुनर्वसनमध्ये भुखंडच नाही. तर यांनी शौचालय बांधले तरी कुठे असाही सवाल अनिल वानखडे यावेळी उपस्थित केला.
शासनाचे धोरण राबविणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी योजनाच कागदावर दाखवुन मोठा मलीदा लाटला आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आमरण उपोषणाला बसु असा गंभीर इशारा घुईखेड वासीयांनी यावेळी दिला.
या पत्रपरीषदेला रवि उदयकर, ग्रा. पं. सदस्य सचिन मेहर, मोहन मालोडे, आशुतोष गुल्हाने, संदिप सोळंके, लहानु मेश्राम, राजु पाचखेडे, अशोक नवघरे, संजय चनेकार, शंकरराव भोयर आदी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।