कळमगावच्या ग्रामसेविकेने शासनाच्या देयकाचा चेक महिनाभर ठेवला स्वतःजवळ – ग्रामपंचायतचे केले नुकसान

0
1064
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे  / शहेजाद खान –

चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कळमगांव ग्राम पंचायतच्या महिला ग्रामसेविकेचा अजब गजब कारभार समोर आला आहे. शासनाच्या देयकाचा चेक अवैध रितीने महिनाभर स्वतःजवळ ठेवुन ग्रामपंचायतचे नुकसान केले आहे. त्यामुळे सदर ग्रामसेविकेवर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
प्राप्तमाहितीनुसार, सन 2015-16 च्या तालुक्यातील कळमगांव ग्रामपंचायतमध्ये दलित वस्ती सुधारणा निधीचा बॅक आॅफ इंडिया,चांदूर रेल्वेच्या शाखेचा 4 लाख 50 हजार रूपयांचा चेक तेथील ग्रामसेविकेने 30 डिसेंबरला स्थानिक पंचायत समिती मधून उचलला. सदर चेक बँकेत जमा न करता चक्क महिनाभर आपल्या जवळ ठेवल्याची धक्कादायक बाब पुढे आली असून शासनाचे नुकसान करणारी आहे. ग्रामसेविकेने चेक उचलून लगेच बॅकेत जमा केला असता तर 4 लाख 50 हजारावर महिन्याअखेरीस व्याज कळमगांव ग्राम पंचायतला मिळाले असते. परंतु सदर ग्रामसेविकेचा कारभार हा “हम करे सो कायदा” अशा प्रकारे असल्यामुळे चांदूरवाडी ग्राम पंचायतमध्ये कार्यरत असतेवेळीही या ग्रामसेविकेच्या बऱ्याच तक्रारी झाल्याचे समजते. शासनाच्या खात्याचे चेक महिनाभर अवैधरित्या स्वतः जवळ ठेवने हा एक प्रकारे गुन्हा असुनही निगरगठ्ठ ग्रामसेविका नाहक दलित वस्ती सुधारणा योजनेचे काम थांबवित असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून सदर ग्रामसेविकेवर स्थानिक गटविकास अधिकारी यांनी दंडात्मक कार्यवाही करून समज द्यावी जेणेकरून पुन्हा भविष्यात अशी गंभीर चूक होणार नाही, अशी तक्रार विनोद नागमोते यांनी दिली आहे. सदर तक्राराची प्रत अमरावती मुख्यकार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, उप कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती, आमदार व पंचायत समिती सभापती सौ. जाधव यांना दिली आहे.