चांदुर रेल्वे तालुक्यातील रस्ते झाले छिन्नविछिन्न – नागरीकांचे होत आहे हाल

0
1077
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान) 
      तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. त्यात चांदुर रेल्वे – अमरावती या मुख्य रस्त्याची अवस्था तर पाहण्याजोगी झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गतवर्षीच्या पावसामुळे तसेच गेल्या काही वर्षांत कुठलीही मोठी दुरुस्ती न झाल्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील इतर तालुक्यांना जोडणारे रस्ते पूर्णत: उखडले आहेत. नागरिकांचा रोष आणि प्रसारमाध्यमांच्या पुराव्यानंतर लक्ष देऊन बांधकाम विभागातर्फे तात्पुरती डागडुजी करून घेतले. मात्र तरीही तालुक्यातील अनेक रस्ते ‘जैसे थे’ आहे.
     चांदूररेल्वे शहरवासी तसेच तालुक्यातील इतर ग्रामस्थांसाठी जीवन जगण्याचा मुख्य रस्ता म्हणून अमरावती ची ओळख आहे. शहरातील प्रत्येक व्यवसाय अमरावती शहरावर आधारलेला आहे. परंतु सध्या चांदुर वासियांची हि नाळ तुटली असून खराब झालेल्या रस्त्यांमुळे अमरावती जाणे म्हणजेच चांदूर वासियांसाठी तारेवरची कसरत झाली आहे. शहरातील अमरावती रोड वरील पेट्रोलपंपपासून थेट चिरोडी, पोहरापर्यंत छिन्नविछिन्न झाला आहे. त्यामुळे वाहनचालक नियम सोडून कधी उजवीकडुन तर कधी डावीकडुन चालवितांना दिसतात.  यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाळूचे ट्रक मधातच बंद पडलेले असतात तर अनेक चांगल्या गाड्याही फेल पडतांना दिसत आहे. कुऱ्हाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे हाल तर याहूनही खराब आहे. यामुळे नागरिकांना मणक्याचे आजार जडत आहे.
       यासोबतच धामणगांव, वर्धा या रस्त्यांचे हाल बेहाल झाले आहे.  या सर्व रस्त्यांवर मागील महिन्यात डागडुजीचे काम झाले आहेत. परंतु सद्या संपूर्ण रस्ता दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील अंतर्गत गावात जोडणारे रस्ते ही खराब झाले असून ग्रामीण जनतेमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. घुईखेड, राजुरा, नांदगाव, कारला, पळसखेड, बोरी, धनोडी, मालखेड इत्यादी मोठ्या गावातील रस्त्यांची हालत खराब झाली आहे.  सध्यातरी या रस्त्यांच्या दुरुस्तीचे कुठलीही तयारी दिसुन येत नसून पुढील अंदाजपत्रकात कामाला मंजुरी मिळाल्यास ते काम होईल असा अंदाज बांधकाम विभागाने व्यक्त केला.
रस्त्याची लवकरच दुरूस्ती – सहाय्यक अभियंता श्री नांदुरकर
तालुक्यातील मोठ्या रस्त्यांवर डागडुजीकरिता अंदाजे 60 लाख रुपये खर्च झाला आहे. उर्वरित रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यापूर्वी ते होतील असे अपेक्षित आहे. कुऱ्हा रस्त्याचे तीन किलोमीटरच्या कामाचे टेंडर प्रोसेस झाले असून तो रस्ता लवकरच दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्री. नांदुरकर यांनी सांगितले.
रस्त्याच्या निधीसाठी सरकारविरोधात बोंबा का? 
एकेकाळी चांगले रस्त्यांच्या बाबतीत जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुका आघाडीवर होता. मात्र सद्या रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. याकडे लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष होत असतांना मात्र लोकप्रतिनीधी रस्त्यासाठी निधी मिळत नसल्याच्या बोंबा सरकारविरोधात मारत होते. त्यामुळे या रस्त्यासाठी निधी मिळत नाही आहे की हे लोकप्रतीनिधींचे अपयश आहे ? असा प्रश्न एका शहरवासीयाने उपस्थित केला आहे…