५ दिवसांत रेल्वे थांबा मिळणार की खा. श्री तडस राजीनामा देणार ? …. काऊंटडाऊन सुरू… तालुकावासीयांचे लागले आहे लक्ष

0
1413
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
      चांदूर रेल्वे शहर हे तालुक्याचे ठिकाण असतांनासुध्दा अनेक महत्वाच्या सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आलेला नाही. रेल्वे थांब्यासाठी काही वर्षांपासुन रेल रोको कृती समीती प्रयत्न करीत आहे. तसेच वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस सुध्दा पाठपुरावा करीत आहे. तसेच २५ डिसेंबरला एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी २ महिन्यांत थांबा मिळवुन देण्याचे आश्वासन दिले होते, अन्यथा भारतीय रेल्वे, नागपुर विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे येत्या ५ दिवसांत दोन महिने पुर्ण होणार असल्यामुळे चांदूर रेल्वे शहराला रेल्वे थांबा मिळणार की खा. तडस रेल्वेच्या पदाचा राजीनामा देणार ? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
       चांदूर रेल्वे शहरात रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा ही मागणी अनेक वर्षापासुनची आहे. रेल्वे थांबा मिळण्यासाठी रेल रोको कृती समितीमार्फत वेळोवेळी खासदार, रेल्वे प्रशासनाला अनेक निवेदने व विनंती अर्ज करण्यात आले. तसेच आंदोलने सुध्दा करण्यात आली. मात्र तरीही थांबा मिळालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी रेल्वे थांब्याचे वचन चांदूर रेल्वे वासीयांना खासदार रामदास तडस यांनी दिल्यानंतर ते अजुनही पुर्ण न केल्यामुळे त्यांच्याप्रती शहरवासीयांत रोष आहे. २०१४ पासुन प्रत्येकवेळी चांदुर रेल्वे शहरात आले असता ते रेल्वे थांब्याचे खोटे आश्वासन देतच गेले. अखेर मागील २५ डिसेंबरला एका कार्यक्रमासाठी ते चांदुर रेल्वे शहरात आले असता त्यांनी काही नगरसेवक, कार्यकर्ते, शहरवासीयांसोबत स्थानिक विश्रामगृहात चर्चा केली होती. यावेळी खासदार तडस यांनी येत्या दोन महिन्यात अमरावती-जबलपुर-अमरावती व अमरावती-अजनी-अमरावती या दोन रेल्वे गाडीला थांबा मिळवुन देण्याचे आश्वासन दिले व सदर आश्वासन पुर्ण न झाल्यास दोन महिन्यात भारतीय रेल्वे, नागपुर विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे वक्तव्य खा. तडस यांनी केले होते. त्यामुळे खासदारांच्या अशा बोलण्यावरून चांदुर रेल्वे येथे रेल्वे थांबा मिळण्याची चिन्हे दिसत आहे. परंतु हे ही आश्वासन हवेतच विरणार की काय अशा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण २ महिन्यांचा कालावधी पुर्ण होण्यास केवळ ५ दिवस शिल्लक राहिलेली आहे. अशातच या ५ दिवसांत खा. तडस रेल्वे थांबा मिळवुन देणार की आपल्या रेल्वेच्या पदाचा राजीनामा देणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. खा. तडस यांनी रेल्वे थांब्याची मागणी पुर्ण होत नसल्यामुळे राजीनामा दिल्यास ही रेल्वे विभागासाठी एक दुर्दैवी बाबच म्हणावी लागेल.
खासदारांनी रेल थांब्याचं नेतृत्व करावं – नितीन गवळी
     रेल्वे रोको कृती समितीतर्फे आम्ही रेल्वे बोर्डात, मंत्रालयात अनेक निवेदने दिली आहे. मात्र अद्यापही थांबा मिळालेला नाही. खा. तडस सुध्दा गेल्या ३ वर्षांपासुन रेल्वे थांब्यासाठी प्रयत्न करीत आहे. तरीही काहीही झालेले नाही. खासदारांचं केंद्रात कोणी ऐकत नाही, असा समज जनमानसात तयार होत आहे. येत्या ५ दिवसांत खा. तडस यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना रेल्वे समितीच्या पदाचा राजीनामा देणे भागच आहे. मात्र हा राजीनामा देऊन त्यांनी रेल्वे थांब्याचं नेतृत्व करावं जेणेकरून चांदूर रेल्वे वासीयांना विश्वास होईल की खासदार साहेब शहरवासीयांसोबत आहे असे रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी यांनी म्हटले आहे.