उभ्या ट्रॉलीला दुचाकी ची धडक २ जण ठार- एक जण गंभीर जखमी

0
726
Google search engine
Google search engine

कविठा-जोडमारोती मार्गावरील अपघात

अमरावती / कविठा बू. : –

वेगात असलेली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जावून आदळल्याने घडलेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला. काल शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास कविठा-कांडली-जोडमारोती मार्गावर हा अपघात घडला. शिवा बोमा जामुनकर (२३) आणि राज बाजीलाल सावरकर (१२) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मंगेश साबूलाल जामुनकर (१५) हा या अपघातात गंभीररीत्या जखमी झाला.
शिवा बोमा जामुनकर हा आपल्या दुचाकीने परतवाड्याहून कविठा मार्गे जात होता. त्याला तळेगांव येथे एका शेतात सुरु असलेल्या कापणीच्या कामासाठी जायचे होते. यावेळी दुचाकीवर शिवासमवेत राज आणि मंगेशसुद्धा होता. वाटेत जोडमारोती नागरवाडी येथे एक ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. शिवाच्या मोटरसायकलला हेडलाईट नव्हता. त्यामुळे अंधारात शिवा जामुनकरला ही ट्रॉली दिसली नाही. त्याची दुचाकी भरधाव वेगात होती आणि ती ट्रॉलीवर जोरदार जावून आदळली. अपघातात शिवा आणि राज यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. मंगेश याला गंभीर दुखापत झाली. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अमरावती येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.