‘डीवायएफआय’ व ‘एसएफआय’ चा मंत्रालयावर धडकला महामोर्चा

0
804
Google search engine
Google search engine

‘डीवायएफआय’ व ‘एसएफआय’ चा मंत्रालयावर धडकला महामोर्चा

मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा
शिक्षण आणि नोकरीसाठी हजारो युवक विद्यार्थी उतरले रस्त्यावर

बीड प्रतिनिधी:- दिपकगित्ते/ नितीन ढाकणे

: डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) व स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या संयुक्त नेतृत्वाखाली आज भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनी २३ मार्च रोजी मंत्रालयावर महामोर्चा धडकला.
दुपारी आझाद मैदान समोरील रोडवरून हा मोर्चा सुरू झाला. पोलिसांसोबत आंदोलक युवा विद्यार्थ्यांशी बाचाबाची झाली. नंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ बोलावले. सीएम यांच्यासोबत चर्चा सुरू झाल्यानंतरच रोडवर बसलेले आंदोलक कार्यकर्ते आझाद मैदान येथे गेले. सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
शिक्षण आणि नोकरीसाठीच्या या महामोर्चात युवक विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला.
राज्य व केंद्र सरकारने केवळ पोकळ आश्वासनांचा पाऊस पडला. प्रत्यक्षात मात्र काहीही केले नाही. शिक्षणावरील खर्च वाढविण्याऐवजी सरकार सातत्याने त्यात कपात करत आहे. शिष्यवृत्ती देखील बंद करण्याचा घाट घातला जात आहे. राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणातून बाहेर फेकण्याचे काम सरकारने केले आहे. कंपन्यांना शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेऊन तर सरकारने कार्पोरेट क्षेत्राला पूर्णपणे शिक्षणाचा बाजार करण्याचा परवानाच दिला आहे. यातून सार्वत्रिक शिक्षण व्यवस्था मोडून काढण्याचा प्रयत्न होत आहे. विविध शैक्षणिक संस्थांवर हल्ले केले जात आहेत. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्याऐवजी नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली. आहे त्या सरकारी कर्मचारी संख्येत ३० टक्के कपात करण्याचे धोरण सरकारने घेतले. म्हणूनच सरकारी विभागात कमी जागा निघत आहेत.
यावरून सध्याचे सरकार किती लबाड आहे. याबद्दल युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मागील महिन्यात ‘डीवायएफआय’ व ‘एसएफआय’ ने राज्यव्यापी जत्था काढला होता. युवक व विद्यार्थी यांची एकजूट निर्माण करून आपल्या हक्क व अधिकाराठी ‘डीवायएफआय’ व ‘एसएफआय’ च्या संयुक्त नेतृत्वाखाली भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात आला. “शिक्षणाची संधी आणि नोकरीचं काय? जाहिरातबाज सरकारला जाब विचारा” हि मुख्य घोषणा करत ‘डीवायएफआय’ व ‘एसएफआय’ ने युवक आणि विद्यार्थ्यांना या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सामील केले.
या मोर्चाद्वारे पुढील मागण्या ‘डीवायएफआय’ व ‘एसएफआय’ ने केल्या आहेत. नोकर भरतीवरील बंदी उठवा.पद कपात करणे थांबवा. कंत्राटी पद्धती बंद करा. शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करा. सर्व शाळा – महाविद्यालयात मुलभूत सुविधा पुरवा. खाजगी शैक्षणिक संस्थांमधील फी वाढीवर निर्बंध घाला. शिक्षण हक्क कायद्यानुसार मागास घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या २५ टक्के आरक्षणाची सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी करा. आयटीआय विद्यार्थांना रु.२५०० प्रती महिना स्टायफंड द्या व त्यांचे इतर सर्व प्रश्न मार्गी लावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाची बंद केलीली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा. सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीमध्ये महागाईनुसार वाढ करा. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करा. ईबीसी सवलतीची प्रभावी अंमलबजावणी करा. कुटुंबातील एका व्यक्तीकडे असलेले जातीचे प्रमाणपत्र संपूर्ण कुटुंबाकरिता ग्राह्य मानण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसह इतर बऱ्याच महत्वपूर्ण मागण्या या मोर्चात करण्यात आल्या आहेत.
हा युवा विद्यार्थी महामोर्चा आझाद मैदानात गेल्यानंतर सभा संपन्न झाली. या सभेस ‘एसएफआय’ राष्ट्रीय महासचिव डॉ.विक्रमसिंग, ‘डीवायएफआय’ राष्ट्रीय महासचिव अवोय मुखर्जी, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे, आमदार जे.पी.गावित, ‘डीवायएफआय’ राज्याध्यक्ष सुनील धानवा, ‘एसएफआय’ राज्याध्यक्ष मोहन जाधव, ‘डीवायएफआय’ राज्य सरचिटणीस प्रिती शेखर, ‘एसएफआय’ राज्य सरचिटणीस बालाजी कलेटवाड, प्रदीप साळवी आदींनी संबोधित केले.
जाती अंत संघर्ष समितीचे निमंत्रक शैलेंद्र कांबळे, कामगार नेते एस.के.रेगे, प्राध्यापक संघटनेचे किशोर ठेकेदत्त यांनी या महामोर्चास पाठिंबा दिला.
या मोर्चाचे नेतृत्व ‘डीवायएफआय’ व ‘एसएफआय’ या दोन्ही संघटनांचे राज्य सचिव मंडळ सदस्यांनी केले.