भगवानबाबांची शक्ती वाढावी यासाठी जीवनातला प्रत्येक श्वास खर्च करेल – ना पंकजाताई मुं

0
836
Google search engine
Google search engine

भगवानबाबांची शक्ती वाढावी यासाठी जीवनातला प्रत्येक श्वास खर्च करेल – ना पंकजाताई मुंडे

भगवानगडाच्या लेकीने तागडगांवच्या नारळी सप्ताहात जिंकली भाविकांची मने

प्रतिनिधी- दिपक गित्ते व नितीन ढाकणे

बीड दि. ०५ – जाती धर्माच्या नावांवर फूट पाडणारी वाळवी सध्या समाजाला लागली आहे, अशा परिस्थितीत समाज एकसंघ राहणे आवश्यक आहे असे सांगून भगवानबाबांची शक्ती वाढावी यासाठी जीवनातला प्रत्येक श्वास खर्च करेल असे भावोद्गार काढून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्रीतथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी नारळी सप्ताहातही भाविकांची मने जिंकली

राष्ट्रसंत भगवानबाबा यांनी सुरु केलेल्या नारळी सप्ताहाची सांगता ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज तागडगाव ता. शिरूर येथे उत्साहात संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. भगवान गडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री महाराज, ह.भ.प. राधाताई सानप, प्रज्ञाताई मुंडे, तागडगावचे सरपंच भागवत सानप, आदी यावेळी उपस्थित होते.

नारळी सप्ताहाचे व्यासपीठ हे राजकीय नाही त्यामुळे इथे राजकीय भाषणाचा प्रश्नच येत नाही असा उल्लेख भाषणाच्या सुरुवातीलाच करून ना. पंकजाताई मुंडे यांनी भगवान गडाची लेक म्हणून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आली असल्याचे सांगितले. भगवान बाबांच्या कोणत्याही मंचावर असले की मला दहा हत्तीचे बळ येते, सप्ताहाला हेलिकॉप्टरने यावे, ही लोकांची इच्छा होती परंतु हेलिकॉप्टर मिळत नव्हते. शेवटी बाबांचा आशीर्वाद असल्यामुळेच मी तुमची इच्छा पूर्ण करून हेलिकॉप्टरने येथे येऊ शकले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची भगवानबाबांवर अपार श्रद्धा होती, त्यांचे जीवन हे कर्णासारखे होते, लोकांना ते नेहमी देत गेले आणि हीच खरी संतांची शिकवण असल्याचे त्या म्हणाल्या. धर्म शक्ती आणि राज शक्ती यामध्ये फार मोठी ताकद आहे. ह्या दोन्ही शक्ती जशा श्रद्धेच आणि विकासाच बीज लावू शकतात तसाच संहार देखील करू शकतात पण हा संहार प्रकृतीचा करायचा की प्रवृतीचा हे ठरविणे आवश्यक आहे. धर्मशक्ती आणि राजशक्ती या दोन स्वतंत्र ताकदी आहेत. या दोन्हींच्या कोणत्याही मंचाचा वापर राजकारणासाठी झाला नाही पाहिजे, ही आपली नेहमीच भूमिका राहिली आहे आणि हीच प्रथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वर्षानुवर्षे पाळली असे सांगून सध्य परिस्थितीत समाजाने एकसंघ राहणे हिच खरी शक्ती असल्याचे त्या म्हणाल्या.

सप्ताहा एवढाच निधी विकासालाही

समाजाची शक्ती अखंड रहावी, यात कसलाही जय पराजय मानण्याचे कारण नाही हेच आपले मत आहे. धर्माच्या व्यासपीठावरून मी कधीही राजकीय भाषण केले नाही व करणारही नाही. भगवानबाबांची शक्ती वाढावी यासाठी जीवनातला प्रत्येक श्वास खर्च करेल . सप्ताहाला जेवढा खर्च झाला आहे तेवढाच निधी या गावच्या विकासाला देईल. हा निधी राजकीय समजू नका, तुमच्या भूमीपुत्राच्या लेकी कडून मिळालेली प्रेमाची भेट समजा तुमच्या गावचा विकास झाल्यास तुमचे आशीर्वाद मला मिळाले असे मी समजेन अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

समाजाने एकसंघ रहावे

समाजाला जातीधर्माच्या नावावर फुट पडणारी वाळवी सध्या लागली आहे पण अशा परिस्थितीत एकमेकांशी वाद किंवा भांडण न करता एकजुटीने राहणे हीच खरी आपली शक्ती आहे. ऊस तोडणाऱ्याच्या हातात परत कोयता येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे असे सांगून ना. पंकजाताई मुंडे यांनी भगवानबाबांचे विचार आपण कधीही खाली पडू देणार नसल्याचे सांगितले.

लाडक्या लेकीची जंगी मिरवणूक

ना. पंकजाताई मुंडे यांचे सकाळी तागडगाव येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. यावेळी गावकऱ्यांनी  खास सजवलेल्या रथातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. सप्ताहासाठी आलेले पंचक्रोशीतील भाविक तसेच महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. व्यासपीठावर आगमन होताच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांचे स्वागत झाले. ‘भगवानबाबा की जय’, ‘ मुंडे साहेब,अमर रहे’, ‘कोण आली कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली’ च्या घोषणांनी वातावरण यावेळी दुमदुमून गेले होते.