राष्ट्रवादीला धक्का मांडव्याच्या सरपंच भाजपात दाखल

0
1180
Google search engine
Google search engine

राष्ट्रवादीला धक्का ; मांडव्याच्या सरपंच भाजपात दाखल

मांडवा विकासासाठी दत्तक घेतले – ना. पंकजाताई मुंडे

गांव तिथे विकास दौरा अंतर्गत ४० लाख रु. च्या कामाचा थाटात शुभारंभ

बीड: नितीन ढाकणे,दिपक गित्ते

दि. ०५ —— राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देत तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतीचे सरपंच पार्वतीबाई मुंडे व त्यांचे पती सुंदर मुंडे यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी काल भाजपात प्रवेश केला. हे गांव विकासासाठी दत्तक घेत असल्याची घोषणा करत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी याठिकाणी ४० लाख रु.च्या कामाचा शुभारंभ यावेळी केला.

गांव तिथे विकास दौरा अंतर्गत बुधवारी रात्री ना. पंकजाताई मुंडे यांची मांडवा येथे जंगी सभा झाली. त्यांचे स्वागता करण्यासाठी अख्खा गाव लोटला होता. गावक-यांनी त्यांचे फटाक्यांच्या अतिषबाजीत जोरदार स्वागत केले. गावांतील लहान थोर व तरूण मंडळी तसेच महिला यात सहभागी झाल्या होत्या. ग्रामविकास निधीतून अंतर्गत रस्ते सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, प्रवाशी निवारा, तसेच खासदार फंडातील दहा रू. लाख रूपयांच्या सांस्कृतिक सभागृहाच्या कामाचा शुभारंभ ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केला.

ना. पंकजाताई मुंडे यांच्याच नेतृत्वा खाली गांवचा विकास होऊ शकतो हे लक्षात घेऊन सरपंच पार्वतीबाई मुंडे, त्यांचे पती सुंदर मुंडे, ग्रामपंचायत सदस्य रुक्मिनबाई चाटे, अन्तिका माने, यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाषणाच्या सुरवातीलाच ‘ यह तो एक झाकी है,’ अशा शब्दात ना. पंकजाताई मुंडे त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, विकासापासून मांडवा गांव कोसो दूर होते, आता सरपंचाचा प्रवेश झाल्यामुळे गांवचा विकास करणे मला सहज शक्य होईल. एक रुपयाचीही अपेक्षा न करता त्यांनी प्रवेश केला आहे त्यामुळे मांडवा गाव दत्तक घेवून याचा सर्वांगिण विकास मी करणार आहे. प्रत्येक गावात हाय मास्ट दिवे व शुद्ध पाण्यासाठी फिल्टर प्लांट मंजूर केला आहे तसाच इथे पण होईल. गावाला पाणी पुरवठा योजनेसाठी जि.प. मधून पैसे मिळवून देवू व पुढच्या वेळी गावात येण्यापूर्वी हे काम पूर्ण करू.

राष्ट्रवादीने फक्त घरं फोडण्याचेच काम केले

लोकनेते मुंडे साहेबांनी मतदारसंघात विकासाचा सागर आणला परंतु त्या काळात काम करणाऱ्या लोकांनी खालपर्यंत विकासच पोहोचू दिला नसल्याने हा भाग तसाच राहिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेत असताना त्यांच्या आताच्या नेत्यांनी या भागात एकही काम केले नाही. प. महाराष्ट्रातले नेते येथे येऊन फक्त घर फोडण्याचे काम करतात अशी टीका त्यांनी केली विकासाचा आस्वाद घ्यायचा असेल तर चांगल्या नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभे राहा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा साविता गोल्हार, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, आदीसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.