*वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांना धमकावणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करा – सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी*

0
1225
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव/हेमंत व्यास :-

साप्ताहिक वज्रधारीचे संपादक व दै. पुढारी इंटरनेट आवृत्तीचे ख्यातनाम ब्लॉग रायटर दत्तकुमार खंडागळे यांना वारंवार फोन वरून धमकावणे व शिवीगाळ केली जात आहे. या प्रकारचा गंभीर परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. याचा निषेध करत दत्तकुमार खंडागळे यांना धमकावणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करावे, अशी मागणी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार रंजना उबरहंडे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गणेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष अतुल जाधव कडेगाव तालुका अध्यक्ष विनायक विभुते, कोल्हापुर येथील जेष्ठ पत्रकार सरदार करले, विनायक पवार, वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे, राजेंद्र काळे, रामदास साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत गायकवाड व दत्तात्रय सपकाळ उपस्थित होते.

सामाजिक घटनांवर व अन्यायाला वाचा फोडणारे धडाडीचे व निर्भीड पत्रकार म्हणुन दत्तकुमार खंडागळे यांना सर्वत्र ओळखले जाते. गेल्या १२ वर्षांपासून दत्तकुमार खंडागळे हे ‘वज्रधारी’ या त्यांच्या साप्ताहिकातून शासनाच्या कामकाजावर प्रखर दृष्टी ठेवून अन्यायाविरोधात वाचा फोडली पाहिजे. या भावनेतून खंडागळे हे नेहमीच तटस्थ राहत आले आहेत. जे चूक आहे त्याविरुद्ध आम्ही नेहमीच बोलणार व पत्रकार म्हणून स्टँड घेणारच या अट्टाहासापोटी कटू सत्याची जाणीव करून देणाऱ्या खंडागळे यांना काही समाजकंटक फोनवरून धमकी देऊन शिवीगाळ करीत आहेत. या गोष्टीचा निषेध करीत कोल्हापूर, खानापूर, कडेगाव, तासगाव, पलूस यासह जिल्ह्यातील पत्रकारांनी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व तहसीलदार रंजना उबरहंडे यांची भेट घेतली.

वज्रधारी या साप्ताहिकातून त्यांनी भाजप सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संभाजी भिडे, खा. संभाजी महाराज यांच्यासह अनेक सामाजिक विषयावर परखडपणे आपले मत मांडले आहे. काँग्रेसची सत्ता असताना देखील सरकार विरोधात याच प्रकारची भूमिका घेत दत्तकुमार खंडागळे यांनी परखड लिखाण केले होते. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, स्व. आर.आर. पाटील, स्व. पतंगराव कदम, आ.जयंतराव पाटील यांच्यासह दिग्गजांचे खंडागळे यांनी आपल्या लेखणीतून वाभाडे काढले होते. त्यामुळे खंडागळे यांच्यासारख्या जिगरबाज पत्रकाराला समाजात दुही माजवणाऱ्या कंटकाकडून फोनवरून धमक्या देऊन शिवीगाळ केली जात आहे. त्यामुळे आज पत्रकारांच्या विचारांची व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे.

परंतु, कोणत्याही धमक्यांना घाबरून दत्तकुमार खंडागळे यांनी आजवर आपली धारदार लेखणी कधीही बोथट होऊ दिली नाही. उलटपक्षी, दिवसेंदिवस त्यांच्या लेखणीची धार अधिक तीव्र होत चालली आहे. मात्र, त्यांच्या परखड लिखाणामुळे लोकशाहीची गळचेपी व लोकशाहीचा चौथा स्तंभ पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत. परिणामी, खंडागळे यांना फोनवरून अनेक धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातही भीतीचे वातावरण आहे. तिसरीत असणारी त्यांची छोटी मुलगी गीता ” बाबा काळजी घे ” तर मुलगा ओंकार ” बाबा घरातून जाताना कोयता घेऊन जा” असा काळजाला भिडणारा सल्ला देत आहे. परंतु, धमक्या देणाऱ्या माथेफिरूंना आठ वर्षांच्या चिमुरडीची बापाबद्दल वाटणारी काळजी आणि भीती कशी कळणार ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

आपल्या घटनेने काही मूल्ये ठरवून दिली आहेत. त्यामुळे समता, धर्मनिरपेक्षता या बाबतींमध्ये तडजोड होऊच शकत नाही. धर्माच्या आधारे राजकारण करणाऱ्यांना मी विरोध करणारच या भावनेतून खंडागळे काहींच्या विचारांना विरोध केला पण कोणत्याही माणसाशी वैर पत्करले नाही. तरीही, दत्तकुमार खंडागळे यांना धमकी हा प्रकार रोजचाच झाला आहे. परंतु, कटू सत्य सांगणारे पत्रकार म्हणून त्यांची वाखाणणी करणारा चाहता वर्ग आणि हितचिंतक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. खंडागळे यांना धमकी मिळाल्याचे समजताच आज शुक्रवार दि. १३ रोजी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या सह
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाने दत्तकुमार खंडागळे यांची व कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात दत्तकुमार खंडागळे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून धमकी देणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पत्रकार तुषार टिंगरे, विनायक कदम, राजेश जाधव, प्रवीण धुमाळ, चंद्रकांत जाधव, दिपक पवार, शिवाजी मोहिते, आनंदा मोहिते, आनंदा साळुंखे, समीर तांबोळी, विठ्ठल भोसले, दरिकांत माळी, सागर गुरव, स्वप्नील पवार, रमेश जाधव, चंद्रकांत गायकवाड, प्रसाद पिसाळ पत्रकारवर्यांच्या यांच्यासह सांगली जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.