नाणार प्रकल्पाबाबत सेना – भाजपा या दोघांकडूनही कोकणवासीयांचा विश्वासघात – धनंजय मुंडे

448

भूसंपादनाबाबतची अधिसूचना रद्द करण्याची उद्योगमंत्र्यांची घोषणा म्हणजे फार्स  – धनंजय मुंडे।

मुंबई दि 23 —– कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाबाबत सेना – भाजपा या दोघांकडूनही कोकणवासीयांचा विश्वासघात आणि फसवणूक करणे सुरू आहे, आज नाणार भूसंपादनाबाबत 18 मे 2017 ची अधिसूचना रद्द करण्याची उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलेली घोषणाही फार्सच असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

नाणार मध्ये उद्योग मंत्री यांनी आज केलेली घोषणा आणि आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची नाणार मध्ये  झालेली सभा याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना ते बोलत होते.

नाणार मधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची कोणतीही कारवाई विभागाने सुरूच केलेली नसतांना ही घोषणा म्हणजे शिवसेना कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर केलेला दिखावा आहे. देसाई यांनी या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का ? कॅबिनेट निर्णय झाला आहे का ? हा प्रकल्प नाणार मध्ये येणार हे माहीत असतांना आज पर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले ?  असे सवाल उपस्थित करतानाच सेना आणि भाजपा हे दोघे मिळून कोकण वासीयांची फसवणूक करत आहेत ,  विश्वासघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दिल्ली मध्ये कोणाची पत आहे आणि कोणाची नाही हे मला माहित नाही पण भाजपा आणि शिवसेना या दोन्ही मंत्र्यांची जनतेच्या मनातून पत गेली असल्याचा टोला लगावतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोकण वासीयांच्या सोबतच आहे, जनभावना लक्षात घेवूनच प्रकल्पाबाबत निर्णय झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा

सामान्य माणसाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्यास त्यात नावे असणाऱ्या विरुद्ध पोलीस कारवाई करतात याच न्यायाने वसंत पवार यांनी मंत्र्यांची नावे लिहून आत्महत्या केली असेल तर त्या मंत्र्यांवर ही गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. पाणीवाटपात केलेल्या भेदभावामुळेच सुशिक्षित शेतक-यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असून त्यास मंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.