पू. भिडेगुरुजी यांची अपकीर्ती केल्याविषयी प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी क्षमायाचना करावी ! – श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

0
802
Google search engine
Google search engine

 

सांगली– ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेला माओवादी हिंसक संघटनांनी साहाय्य केल्याचे ६ मासांच्या पोलीस अन्वेषणात पुढे आले आहे. एल्गार परिषदेच्या आयोजनामागेही माओवाद्यांचा हात आहे. कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीत एल्गार परिषदेने दिलेली चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत ठरली हे आता उघड झाले आहे. त्यामुळे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे नाव दंगलीत गोवून त्यांना अपकीर्त करण्याचे प्रकाश आंबेडकरांचे षड्यंत्र उघडे पडले आहे. त्यामुळे गुरुजींची नाहक अपकीर्ती केल्याविषयी प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी जाहीर क्षमायाचना करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की,

१. कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीनंतर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. या बंदच्या कालावधीत राज्यभर हिंसाचार आणि दंगली उसळल्या. पोलीस बांधवांवर मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले. यात अनेक नागरिक घायाळ झाले. यात खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. ही सर्व हानी त्यांच्याकडून कठोरपणे वसूल करावी, त्याचसमवेत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून प्रसिद्धीमाध्यमांना अश्‍लाघ्य भाषा वापरून शिवीगाळ करण्यात आली, त्याविषयी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

२. कोरेगाव भीमा दंगल आणि एल्गार परिषद यांचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे या परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, पी.बी. सावंत, तसेच तेथे उपस्थित असलेले वक्ते, गुन्हा नोंद असलेले आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांच्यासह संभाजी ब्रिगेड, बामसेफ, कबीर कला मंच अशा संघटनांसह सर्वच सहभागी घटकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून महाराष्ट्रात, अन्य राज्यांत अशा प्रकारे जातीय विष पेरण्याचे कटकारस्थान करण्याचे धाडस भविष्यात कोणीही करणार नाही.

३. प्रकाश आंबेडकर यांच्या नातेवाइकांचा माओवाद्यांशी संबंध यापूर्वीच स्पष्ट झाला आहे. याच माओवाद्यांनी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचण्याचे धाडस केले, तसेच मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तरी या सर्व प्रकारांचा गंभीरपणे विचार करून देशाच्या सुरक्षितेतसाठी याचा संपूर्ण बीमोड करावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत.