सकल मराठा समाजाचा आमदारांच्या घरासमोर ‘घंटानाद’ -आज चांदूर रेल्वे बंदची हाक

0
718
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
गेल्या अनेक दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने सुरू असून आता याची सुरूवात चांदूर रेल्वे तालुक्यातून सुध्दा झाली आहे. स्थानिक सकल मराठा समाजाच्यावतीने आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन शुक्रवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
मराठा समाजावर आरक्षणाच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाविरोधात संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलने होत आहे. सकल मराठा समाजावर होणारे अन्याय, मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी विधानसभा सभागृहात पोटतिडकीने प्रश्न मांडण्यासाठी व त्यांना जागे करण्यासाठी चांदूर रेल्वे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने स्थानिक आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन शुक्रवारी केले. यानंतर आमदारांना निवेदनसुध्दा देण्यात आले.
यावेळी गजानन यादव, स्वप्नील जरे, किशोर यादव, श्रीकांत माने, बाबाराव नागणे, संदिप जरे, विजय मिसाळ, पवन यादव, रितुराज गुजर, रामराव कदम, अजय माहुलकर, अंकित कदम, सागर गरूड, राजु यादव, निखील पवार यांसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
आज चांदूर रेल्वे बंदची हाक
मराठा समाजाला अजुनही आरक्षण न मिळाल्यामुळे होणाऱ्या अन्यायाविरोधात, सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी व आंदोलनादरम्यान बळी गेलेल्या मराठा बांधवांना श्रध्दांजली देण्याकरीता आज (ता. ४) चांदूर रेल्वे बंदची हाक देण्यात आली आहे. याच दरम्यान तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.