गणेशोत्सव, मोहरम कालावधीत अफवा पसरवू नका अफवांवर विश्वासही ठेवू नका जिल्हाधिकारी वि. ना. काळम

0
839
Google search engine
Google search engine

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : गणेशोत्सव व मोहरम हे सण एकाच कालावधीत साजरे होत आहेत. हे सण शांततेत, उत्साहात, एकदिलाने, सामाजिक सलोखा राखत आनंदाने साजरे करावेत. या कालावधीत कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. तसेच, सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत तसेच अफवांवर विश्वासही ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, दैनंदिन जीवनव्यवहारांमध्ये सामाजिक माध्यमांचा वापर अपरिहार्यपणे वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे समाजविघातक ठरू शकणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराचा प्रसार सहजतेने व मोठ्या प्रमाणात होत आहे. समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर रोखणे जरी अवघड असले, तरी तो शेअर न करता त्यांना प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रत्येकाने या माध्यमांचा वापर करत असताना, सामाजिक जाणीव ठेवून ती अधिक सजगपणे वापरावीत.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, अनेक समाजविघातक घटनांसाठी सामाजिक माध्यमांतून पसरणाऱ्या चुकीचा, खोटा व आक्षेपार्ह मजकूर कारणीभूत ठरत आहे. माहितीची शहानिशा न करता फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या अनेक संदेशांमधून अनेकदा अफवा पसरवल्या जातात. त्यातून मानवी संवेदना, सहवेदना, सहनशीलता, सामाजिक सलोखा यावर आघात होऊन अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसतो. हे सर्व टाळायचे झाल्यास सहज उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर सद्सद्विवेकबुद्धीने वापर करावा, असे आवाहन केले.