आता लग्नसराईला लोकसभेच्या आचारसंहितेचा फटका – रोख रकमेबाबत खबरदारी, पोलीस विभागाची राहणार करडी नजर

0
720
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून वर्धा लोकसभा मतदार संघात ११ एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचा फटका मात्र एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लग्नाच्या खरेदीसाठी जातांना सोबत मोठी रक्कम ठेवणे डोकेदुखी ठरू शकणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. वर्धा जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यात सुध्दा अनेक ठिकाणी पथके तैनात केली असून त्यांच्यामार्फत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये वाहन तपासणीसाठी चांदूर रेल्वे उपविभागात तीन स्थिर निरीक्षण पथक नेमण्यात आले आहे. यामध्ये चांदूर रेल्वे येथे अमरावती रोडवर रेल्वे क्रॉसींगजवळ, धामणगाव रेल्वे तालुक्यात देवगांव (फाटा) व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिंगणापुर या ठिकाणाचा समावेश आहे. तसेच चांदूर रेल्वेमार्गावर अमरावती शहरात एन्ट्री करते वेळी एसआरपीएफ कॅम्पजवळ सुध्दा सदर तपासणी पथक आहे. नुकतीच तीन – चार दिवसांपुर्वी एका चांदूर रेल्वे शहरातील युवकाकडून ३ लाख २८ हजारांची नगद रक्कम एका कारमधून जप्त करून चौकशी करण्यात आली होती. कारण आचारसंहितेनुसार १० हजारांहून अधिक रक्कम सोबत बाळगल्यास त्याबाबतची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

अशी मोठी रक्कम आढळल्यास योग्य कागदपत्रे सादर केल्यास कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, कागदपत्रे नसल्यास त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल. योग्य कागदपत्रे नसल्यास रक्कम जप्त करण्यात येणार आहे. चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक नागरिक खरेदीसाठी अमरावती शहरात जातात. लग्नासाठी सोने, कपडे, भांडी, खरेदीसाठी मोठी रक्कम सोबत घ्यावी लागते. यावेळी आगामी दोन महिने अशी मोठी रक्कम बाळगताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. अधिक रक्कम असल्यास बॅँकेतून काढल्याची पावती अथवा एटीएम मधून घेतल्याची पावती सोबत ठेवावी लागणार आहे.

एप्रिल, मे महिन्यात १९ मुहूर्त

एप्रिल व मे महिन्यात एकाचवेळी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि लग्नसराईची गर्दी राहणार आहे. या दोन महिन्यांत १९ विवाहमुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये १७, १८, २२, २४, २६, २७ व २८ तर मे महिन्यात ७, ८, १२, १७, १९, २१, २३, २६, २९, ३०, ३१ रोजी विवाहमुहूर्त आहेत.

खरेदीसाठी जाणाऱ्यांना फटका

आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुक्याच्या  सीमेवर नाके उभारले आहेत. जिल्ह्यात व तालुक्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. खरेदीसाठी सोबत घेतलेल्या पैशाबाबतची कागदपत्रे अधिकाऱ्यांना सादर करावी लागतील, यात संबंधिताला मनस्ताप सहन करावा लागू शकतो.