घरकुल लाभार्थ्यांच्या रेतीसाठी मंडल अधिकारी कर्तव्यदक्ष तर समृध्दीच्या कामासाठी “बेपर्वा” – घुईखेडवासीयांचा आरोप

0
496
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
    घरकुल योजनेचे जिल्ह्यासह चांदूर रेल्वे तालुक्यातील काम केवळ रेती अभावी अडले होते. रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नव्हती. आता घरकुलासाठी विनामूल्य पाच ब्रासपर्यंत रेती मिळत असुन त्याच्या पासेस संबंधित तहसील कार्यालयातुन मिळत असतांना ही रेती घेण्यासाठी मंडल अधिकारी काटेकोरपणे नियमांचे पालन करून काम करीत असुन समृध्दीच्या कामासाठी मात्र महसुल विभाग बेपर्वा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती निशुल्क देण्यास प्रशासन तयार झाले असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना  दिले होते. लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर त्यांना विनामूल्य रेती पास उपलब्ध होत आहे. दिवाळीपूर्वी आपल्या हक्काच्या घरात जाता येईल, असे लाभार्थ्यांचे स्वप्न होते. परंतु या लाभार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा रेतीने केला होता. जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीच उपलब्ध होत नव्हती. विशेष म्हणजे चोरट्या मार्गाने सर्वत्र रेती उपलब्ध असली तरी लाभार्थ्यांना ती रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्या बाहेरचे होते. परिणामी जिल्ह्यातील शेकडो घरकुलाचे बांधकाम रखडले होते. अशातच तहसिल कार्यालयातुन पासेस उपलब्ध होत असतांना सकाळी ११ वाजतापासुन नदीपात्रातुन रेती उत्खनन करता येते. परंतु दोन – तीन दिवसांपुर्वी तालुक्यातील घुईखेड येथील चंद्रभागा नदीपात्रातुन सकाळी ११ वाजायला १५ मिनीट शिल्लक असतांना एक ट्रॅक्टर केवळ नदीपात्रात शिरला असतांना घुईखेडचे मंडळ अधिकारी तेथे पोहचुन ट्रॅक्टरला बाहेर निघण्यास सांगितले. असा मिनीट टू मिनीट कडक नियम घरकुल लाभार्थ्यांच्या मोफत पासेससाठी लावुन मंडळ अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्यदक्षता सिध्द केली. परंतु समृध्दी महामार्गासाठी नियम धाब्यावर बसवुन दिवस – रात्र पोकलँडने खोदकाम असतांना तेव्हा कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी बेपर्वा का ? असा सवाल घुईखेडवासीयांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सर्वांसाठी महसुल विभागाने सारखेच नियम लावुन समृध्दी महामार्गाच्या कंत्राटदारावर सुध्दा कारवाई करण्याची मागणी गावातुन जोर धरत आहे.