आमला (विश्वेश्वर) मध्ये पाण्याच्या प्रति ड्रमसाठी मोजावे लागते ३० ते ४० रूपये – पाणी विकत घेऊन उपजीविका

0
1143
Google search engine
Google search engine

गावात पाण्यासाठी वणवण,  संत्रा बागा सलाईनवर

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) या गावात उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला असून गावातील महिला पुरुष मंडळींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. एेवढं करूनही दैनंदिन उपजीविकेसाठी विकत पाणी घेऊन दिवस काढावे लागत आहे. एकंदरीत गावातील पाणी प्रश्न पेटला आहे,संत्रा बागायतीसाठी म्हणून ओळखला जाणारे हे गाव सध्या पाणी टंचाईचा भीषण सामना करीत आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील सधन गाव म्हणून आमला या गावाची ओळख आहे. १०० टक्के शेती व संत्रा उत्पादक व प्रयोगशील शेतकरी म्हणून या गावचे नाव महाराष्ट्रात आहे. परंतु सध्या या गावात पिण्यासाठी सुद्धा पाणी विकत घ्यावे लागत आहे. फेब्रुवारी च्या सुरवातीलाच या गावात ग्राम पंचायतीतर्फे पाण्याचे टँकर सुरू झाले आहे, ते टँकर ही आता अपुरे पडत असल्यामुळे लोकांना ३० ते ४० रु मोजून ड्रम भर पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने गावात दोन कूपनलिका, व चार हँडपम्प बसविले आहे. परंतु ते ही काही प्रमाणातच यशस्वी झाले असून ते सुध्दा अपुरे पडत आहे.  गावाला भिवापूर तलाव व जळका धरणाच्या विहरीवरून पाणी पुरवठा होत होता. परंतु जानेवारी महिन्यातच हे तलाव आटल्याने पाणी प्रश्न भीषण झाला आहे. ग्राम पंचायतीचे नळ दुर्मिळ झाले असून महिन्यातून कधीतरी ते येत असल्याचे गावकरी सांगतात.

तर दुसरीकडे गावातील संत्रा बागायतीचे हाल बेहाल झाले आहेत.  येथील संत्राचे बागा शेवटच्या घटिका मोजत असल्याचे समजते, २ ते ३ हजार रुपये प्रमाणे टँकर घेऊन संत्राचे रोपटे तसेच आलेले झाडे वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे. पण ते सुद्धा जास्त दिवस टिकणार नसल्याचे ते सांगतात. गावातील ह्या परिस्थितीचा विचार करून काही वर्षांअगोदर पाथरगाव उपसा सिंचन प्रकल्प या व परिसरातील अनेक गावासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्या साठी २० ग्राम पंचायतीने ठराव मंजूर करून घेतल्याचे कळते. मात्र अजूनही या प्रकल्पाचे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने ते काम रडखडले आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांनी या साठी उपोषण आंदोलनेही केलेत, परंतु राजकीय इच्छाशक्ती अभावी हे काम अजूनही सुरू झाले नाही. हा प्रकल्प सुरू झाला असता तर गावातील संत्राबागा व त्यावर आधारलेले अनेक शेतकऱ्यांची शेती शासनाला वाचविता आले असल्याचे मत गावातील शेतकरी बोलून दाखवितात.

टँकर वाढवून मागण्यासाठी प्रयत्न

गावातील लोकसंख्या पाहता गावात ९० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रत्यक्षात ६० ते ८० हजार पाणी मिळत आहे. त्यासाठी शासनाकडून अतिरिक्त टँकरची मागणी आपण करीत असल्याचे मत गावच्या सरपंच रजनी मालखेडे यांनी व्यक्त केले.  मागील वर्षी पेक्षा यावेळची पाणी टंचाई भीषण असल्याचेही त्यांनी सांगितले.

गावातील अर्धे लोक पाण्याच्या मागे

गावात पाणी भरण्याचे एक मात्र काम सुरू असून मिळेल तिथून पाणी मिळविण्याचे प्रयत्न गावातील लोकांचे आहे. रात्री बेरात्री पाणी देऊन संत्रा बागायती वाचविण्याचे प्रयत्न शेतकरी करीत असून, दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी महिलांचे हाल होत असल्याचे मत  गावातील नागरिक गोपाल बकाले यांनी व्यक्त केले.