टोंगलाबाद येथील प्रवाशांचा निवारा उडाला प्रशासनाचे दुर्लक्ष, -पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे हाल

0
534
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे :- (Shahejad Khan) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबाद या गावातील गेल्या तीन महिन्यांपासून प्रवाशांच्या निवाऱ्याचे शेड उडाल्याने येणाऱ्या पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागणार असून याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
   गेल्या तीन महिन्यांपासून टोंगलाबाद या गावातील प्रवाशी निवाऱ्याच्या शेडचे छप्पर उडाले आहे. परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. टोंगलाबाद येथिल अनेक विद्यार्थी चांदूर रेल्वे येथे प्राथमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात. विद्यार्थी चांदूर रेल्वे ते टोंगलाबाद पर्यंत नियमित  एस.टी. बस ने अपडाऊन करतात. परंतु पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यांनी बस ची वाट पाहत कुठे उभे राहावे ? असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.  गेली तीन महिन्यापासून प्रवाशी निवाऱ्याचे छप्पर उडाले, मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही. आता पावसाळ्याच्या दिवसात गावातील प्रवाशी, विद्यार्थी यांना हा त्रास सहन करत भर पावसात उभे राहण्याची वेळ आली आहे.
ग्रामपंचायतीला प्रशासकीय कोणतीही बाब समजत नाही. गेल्या तीन महिन्यापासून प्रवाशी निवाऱ्याचे शेड उडाले. मात्र सरपंच व सचिव यांचे दुर्लक्ष झाले आहे. याची साधी माहिती त्यांनी पंचायत समितीला दिली नाही. त्यामुळे गावातील समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आता विद्यार्थ्यांना व प्रवाशांना त्याच त्रास सहन करावा लागणार आहे.  – सुनील शेळके, माजी सरपंच
शाळेत जाताना दररोज आम्ही उन्हात, पावसात उभे राहतो. आता पाऊस आला तर आम्हाला ओलं होऊन शाळेत जावं लागणार आहे. एस.टी. बस दररोज अर्धा तास लेट येते तर कधी लवकर येते. त्यामुळे आम्हाला बस ची प्रतिक्षा करावी लागते. पण आम्ही थांबावं कुठं ? हा प्रश्नचं आहे.  – रोहित सातपैसे, विद्यार्थी
सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समितीकडे प्रवासी निवाऱ्याच्या शेडबाबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येईल  व लवकरात लवकर शेडची दुरुस्ती करण्यात येऊन समस्या निकाली काढण्यात येईल. – वनमाला मारोटकर, सरपंचा