त्या मद्यधूंद ट्रॅक्टर चालकाची कारागृहात रवानगी – दोन ट्रॅक्टर पोलीसांनी केले जप्त

0
1095
Google search engine
Google search engine
रेल्वे स्टेशनकडे पायी जातांना हटवार यांना ट्रॅक्टरने चिरडल्याचे प्रकरण
चांदूर रेल्वे :-SHAHEJAD KHAN – 
     मद्यधूंद अवस्थेत व भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरने पायदळ रेल्वे स्टेशनकडे निघालेल्या एका ५२ वर्षीय व्यक्तीला चिरडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.१५ वाजता रेल्वे स्टेशन रोडवर विश्रामगृहा जवळ घडली. या घटनेतील आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला १५ दिवसांचा एमसीआर देऊन आरोपीची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सदर घटनेत दोन ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केले आहे.
      चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा (भिलटेक) येथील मुळचे सुभाष महादेव हटवार (वय ५२) व मुलगा अनिकेत सुभाष हटवार (वय १८) हे दोघे चांदूर रेल्वे तहसील कार्यालय येथे उत्पन्नाचा दाखला व जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आले होते. येथील काम आटोपून पायदळ दोघे रेल्वे स्टेशनकडे जात असतांना विश्रामगृहाजवळ मागून येणाऱ्या भरधाव एमएच २७ एल २७३१ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सुभाष हटवार यांना चिरडले. यामध्ये सुभाष हटवार यांचा जागीच मृत्यु झाला. मद्यधुंद ट्रॅक्टर चालक आरोपी राहूल सुखदेवराव वाढोणकर रा. राजना (वय २८) काही नागरीकांनी पकडून चांदूर रेल्वे पोलीसांच्या ताब्यात दिले. चांदूर रेल्वे पोलीसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून फिर्यादी हेमंत सहदेवराव हटवार यांच्या तक्रारीवरून आरेपीविरूध्द कलम २७९ व सदोष मनुष्यवधाचा ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी राहूल वाढोणकर याला पोलीसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला १७ जुलैपर्यंत १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असुन आरोपीची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणात चलाखी करून त्या घटनेतील ट्रॅक्टर ऐवजी दुसरा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला संबंधिताने जमा केला. परंतु ही बाब काहींच्या लक्षात येताच त्यांनी ठाणेदारांना सांगितले होते. त्यानंतर ज्या ट्रॅक्टरने घटना झाली तो एमएच २७ एल २७३१ या क्रमांकाचा ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त रेल  व दुसरा सुध्दा ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात ठेवला असुन जप्त ट्रॅक्टरची संख्या दोन झाली आहे. घटनेचा पुढील तपास एएसआय जाधव करीत आहे.
फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार – ठाणेदार शेळके
या प्रकरणात पोलीसांची दिशाभुल करून ट्रॅक्टर मालकाने दुसराच ट्रॅक्टर पोलीसांच्या स्वाधीन केला होता. त्यानंतर घटना झालेला ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केला. त्यामुळे या प्रकरणात पोलीसांची फसवणुक केल्याचा गुन्हा संबंधित मालकावर दाखल होणार असल्याचे ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांनी सांगितले.