कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 5,800 वरुन 11,632 होणार – कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या मागणीला यश

0
1390
Google search engine
Google search engine

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्यातील दुकाने व आस्थापना येथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 5,800 वरुन 11,632 होणार असल्याचे मत शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या मागणीला यश असल्याचे मत व्यक्त केले आहे.

यावेळी मुलाणी म्हणाले की, राज्यात विविध शासकीय / निम शासकीय कार्यालयात आस्थापने वरील कंत्राटी, बाह्यस्त्रोत कंत्राटी, मानधना वरील कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहेत. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कर्मचारी काम करत आहे. हे कर्मचारी आस्थापना विभागाशी संबंधित असल्याने संबंधित आस्थापना महाराष्ट्र शासन कामगार विभाग ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948’ प्रमाणे वेतन देते. त्यानुषंगाने 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, जेणेकरून कंत्राटी कर्मचारी वेतनात वाढ होईल. अशी मागणी दि. 31/03/2019 रोजी महाराष्ट्र शासन मंत्रालय मुख्य सचिव यांच्या सह प्रधान सचिव सामान्य प्रशासन (सेवा) व प्रधान सचिव कामगार विभाग यांच्या कडे आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली वरून तक्रार करत मागणी शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली होती.

यावर कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी राज्यातील दुकाने व आस्थापना येथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, ही वाढ सुमारे दुप्पट असणार आहे. गेल्या नऊ वर्षापासून ही वाढ प्रलंबित होती. राज्यातील 10 लाख दुकाने आणि आस्थापना यांच्यावरील सुमारे एक कोटी कामगारांना याचा फायदा होणार आहे. किमान वेतन अधिनियम 1948 च्या कलम 03 अन्वये दर 5 वर्षांनी महाराष्ट्र किमान वेतन सल्लागार मंडळाच्या सल्ल्याने रोजगाराचे किमान वेतन पुनर्निधारीत करण्यात येते. मात्र गेल्या नऊ वर्षापासून तांत्रीक कारणास्तव किमान वेतन पुनर्निधारीत करता आले नव्हते. कामगार मंत्री कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे कामगार वर्गाला किमान वेतनवाढ मिळणे शक्य झाले आहे. यात महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्र तसेच महानगरपलिका क्षेत्रापासून 20 कि.मी.पर्यंतचे औद्योगिक क्षेत्र व छावणी क्षेत्र या परिमंडळात काम करणाऱ्या कुशल कामगारांना 5,800 वरुन 11,632, अर्धकुशल कामगांना 5,400 वरुन 10,856, अकुशल कामगारांना 5,000 वरुन 10,021 तर नगरपरिषद परिमंडळातील कुशल कामगारांना 5,500 वरुन 11,036, अर्धकुशल कामगारांना 5,100 वरुन 10,260, अकुशल कामगारांना 4,700 वरुन 9,425 व या दोन परिमंडळ वगळून महाराष्ट्र राज्याच्या उर्वरित क्षेत्रात कुशल कामगारांना 5,200 वरुन 10,440, अर्धकुशल कामगारांना 4,800 वरुन 9,664, अकुशल कामगारांना 4,400 वरुन 8,828 एवढी पुनर्निधारीत करण्यात आलेली आहे. या संदर्भातील अधिसूचना दि.24 जुलै 2019 पासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांचे राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ यांनी आभार व्यक्त करत कंत्राटी कर्मचारी यांना कायम करण्याची मागणी केली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकूंद जाधवर, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, सरचिटणीस शहाजी नलवडे, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.