निवडणूक निरीक्षक (सामान्य) राजीव शर्मा यांची आयटीआयमधील स्ट्राँग रूमला भेट

0
569
Google search engine
Google search engine
धामणगाव रेल्वे मतदार संघातील निवडणुक कामकाजाविषयक घेतला आढावा
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)
विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासनातर्फे युध्दपातळीवर सुरू आहे. अशातच बुधवारी निवडणुक निरिक्षक राजीव शर्मा यांनी चांदूर रेल्वे येथील आयटीआयमधील स्टाँग रूमला भेट देऊन पाहणी केली तथा निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणुक कामकाजाविषयक घेतला आढावा घेऊन सुरू असलेल्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले.
 बुधवारी दुपारी १२ वाजता धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ, चांदूर रेल्वे येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील स्ट्राँग रुमला निवडणूक निरीक्षक (सामान्य) राजीव शर्मा यांनी भेट दिली. यावेळी निवडणूक विषयक कामकाजाची पाहणी केली. मतदान केंद्र तयारी, मतदार यादी, पोस्टल बॅलेट, वाहने/ मिरवणूक / सभा परवानगी,  आचारसंहिता, विविध पथकांचे काम, उमेदवारांची दैनंदिन खर्च विषयक अहवाल, निवडणूक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी व पदाधिकारी यांची प्रशिक्षण तयारी, ईव्हीएमसाठी व्यवस्था व सुरक्षितता आदी बाबींचा आढावा घेतला. तसेच निवडणुक निर्भय, पारदर्शक व शांततापूर्ण मार्गाने पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले आणि स्थानिक प्रशासनातर्फे सुरू असलेल्या तयारीबाबत निवडणूक निरीक्षक राजीव शर्मा यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र इंगळे, प्रशांत भोसले व कर्मचारी उपस्थित होते.
आज १६०० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
निवडणुकीसाठी नियुक्त १६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण आज सकाळी १० वाजतापासुन दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सकाळच्या सत्रात ८०० कर्मचारी व दुसऱ्या दुपारच्या सत्रात ८०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण चांदूर रेल्वे येथील विरूळ मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत देण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र इंगळे, प्रशांत भोसले व भगवान कांबळे हे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे.