चांदूर बायपास चेक पोस्टवर वाहन तपासणी दरम्यान सात लाखांची रोकड जप्त – स्थिर निगराणी पथकाची कारवाई

0
713
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहजाद खान)
अमरावती – चांदूर रेल्वे रोडवरील एसएसटी पथक प्रमुख सतिष गोसावी यांच्या नेतृत्वात बायपास चेकपोस्टवर १७ ऑक्टोंबरला रात्री १२.५० वाजता एका चारचाकी वाहनातून ७ लाख १३ हजार ७५० रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
चांदूर रेल्वे – अमरावती रोडवर बायपासजवळ निवडणूक विभागातर्फे चेकपोस्ट लावण्यात आली असून या ठिकाणी नेमलेल्या स्थिर निगराणी पथकाद्वारे येणार्‍या – जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येते. अशातच १७ ऑक्टोंबरला रात्री १२.५० वाजता महिंद्रा एक्सयुव्ही वाहन क्रमांक एमएच २७ बीई ५९५४ हे धामणगाव रेल्वे येथील संदेश कुचेरीया यांच्या मालकीचे असून या वाहनाची तपासणी केली असता यामधील बॅगमध्ये ७ लाख १३ हजार ७५० रुपये रोख नगदी रक्कम आढळून आली. यामध्ये दोन हजार रुपयाच्या १२ नोटा, दोनशे रुपयाच्या ११९ नोटा, शंभर रुपयाच्या ७६३ नोटा, पाचशे रुपयाच्या ११६२ नोटा व पाचशे रुपयाच्या १७३ नोटा होत्या. सदर रक्कम गाडीमध्ये असलेले व धामणगाव रेल्वे येथील मेडीकल व्यवसायी गोपाल पुंडलिकराव लोंदे यांच्या मेडिकल दुकानाची असल्याचे सांगितले. परंतु मोक्यावर यांच्याकडे सदर रकमेबाबत कुठलाही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे ही रक्कम पंचासमक्ष  पंचनामा करून जप्त करण्यात आली व चांदूर रेल्वे येथील उपकोषागार कार्यालय येथे जमा करण्यात आली. ही कारवाई धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व पथक प्रमुख सतीश गोसावी यांच्या नेतृत्वात अनिल चौरे  राजेश्वर मलमकार, योगेश वंजारी, पोलीस कर्मचारी महेश प्रसाद व २ होमगार्ड यांनी केली.