‘महाशिवआघाडी’विरोधात आंदोलनाचा हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा -युतीसाठी पुण्यात हिंदू संघटनांची आघाडी

0
606
Google search engine
Google search engine

पूणे (प्रतिनिधी) : भाजपा आणि शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी भांडून जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला वारसा सांभाळत दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसह सरकार स्थापन केल्यास आम्ही रस्त्यावर उतरुन वैैचारिक आंदोलन करु, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला. ही महाशिवआघाडी नसून महाधुर्तआघाडी आहे, आम्ही त्यांना आवाहन नव्हे, सावधान करत आहोत, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या पावित्र्यावर सडकून टीका केली.

समस्त हिंदू आघाडी, हिंदू महासभा, श्री शिव प्रतिष्ठान, पतित पावन संघटना, हिंदू एकता आंदोलन या आणि विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी शिवसेना आणि भाजपाला आवाहन करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी मिलिंद एकबोटे, समीर कुलकर्णी, सुनील घनवट, श्याम महाराज राठोड, अनिल पवार आदी उपस्थित होते.

समीर कुलकर्णी यांनी सांगितले, की ‘मतदारांना कोणत्याही राजकीय पक्षाने गृहीत धरू नये. अन्यथा जनता त्यांचे उत्तर मतदानातून देईल. यापुढे या दोन्ही पक्षांचा एकही आमदार निवडून येणार नाही, यासाठी सर्व संघटना मिळून प्रचार करतील. आघाडीबरोबर सरकार स्थापन करून शिवसेना धोक्याच्या घंटा वाजवत आहे. मिलिंद एकबोटे म्हणाले, ‘रामजन्मभूमीचा निकाल आला, त्याच दिवशी भाजप-शिवसेनेतील भांडण विकोपाला गेले. भाजपने जुने दिवस विसरू नये. १५-२० लोकांचा पक्ष मोठा करण्यात असलेले शिवसेनेचे योगदान विसरू नये. शिवसेनेने हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या पक्षांबरोबर जाण्याचे पाप करु नये. जनतेला महाशिवआघाडी मान्य नाही.’