#BanSunburnFestival हा ट्रेंड देशामध्ये प्रथम स्थानी !

188
  • युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या ‘सनबर्न’ला देशाबाहेर हाकला ! – जनतेची ट्विटरच्या माध्यमातून मागणी

  • गोव्यात सरकारने ‘सनबर्न फेस्टीव्हल’ला दिलेली अनुमती रहित करावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

 

मुंबई – २७ ते २९ डिसेंबर २०१९ या कालावधीत ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे गोव्यात आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी गोव्यात अनुमती न मिळाल्याने सनबर्नच्या आयोजकांना पुण्यात स्थलांतर करावे लागले होते. सनबर्नचा आतापर्यंतचा इतिहास पाहता अनेक चुकीच्या गोष्टी समोर आल्या आहेत. सनबर्नमध्ये इलेक्ट्रॉनिक संगीताच्या नावाखाली अमली पदार्थांची विक्री, तसेच सेवन केले जाते. मद्य पिऊन युवक आणि युवती गाण्यांवर नाच करतात. त्यातच मादक द्रव्याचे अतिसेवन केल्याने आतापर्यंत सनबर्नमध्ये १ युवक आणि १ युवती यांचा मृत्यू झाला आहे. सनबर्नच्या आयोजकांनी कोट्यवधी रुपयांचा कर थकवला आहे, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे युवकांना अमली पदार्थांच्या आहारी नेऊन देशाची युवा पिढी रसातळाला नेणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर कायमची बंदी घालावी, अशी मागणी टि्वटरवर जोर पकडू लागली आहे. अशातच १४ डिसेंबर या दिवशी टि्वटरवर #BanSunburnFestival हा ट्रेंड झालेला दिसून आला. हा ट्रेंड होताच घंट्याभरात तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये प्रथम स्थानी आला. साधारण अर्धा घंटा प्रथम स्थानी राहिल्यावर नंतर तो द्वितीय स्थानी गेला. या ट्रेंडमध्ये भारतभरातील लोकांनी सहभाग घेऊन ‘सनबर्न’चे भयावह वास्तव समाजासमोर मांडले आणि त्यावर बंदीची मागणी केली गेली. तसेच ‘गोवा सरकारने यंदा गोव्यात सनबर्नला दिलेली अनुमती रहित करावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे गोवा समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी केली आहे.