*पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या :- माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी*

634

*अमरावती:-*

अमरावती जिल्ह्यामध्ये २८, २९, ३० डिसेंम्बर रोजी असलेल्या थंडीमुळे कापूस व तुरीचे पीक अक्षरशः जळलेले आहे, हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे, कपाशी व तुरीचे पाने सुद्धा झडून गेलेली आहे. कपाशीच्या बोंड्या व तुरीच्या शेंगा करपलेल्या आहे. त्यामुळे सर्व पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारा केली.

निवेदनामध्ये म्हटले की, वरुड तालुक्यातील 36 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे निवेदन मला प्राप्त झालेले आहे. वरुड व मोर्शी तालुक्यात २८, २९, ३० डिसेंम्बर रोजी झालेल्या थंडीमुळे तसेच १ व २ जानेवारी ला झालेल्या गारपिटीमुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. थंडीच्या दवामुळे हिरव्या पान तुरीच्या शेंगा, दाणे, कपाशीची बोंडे यांच्यामधील पाणी गोठून जळण्याची प्रक्रिया होते व शेकडो एकरावरील पिकाचे संपूर्ण नुकसान होते व या पिकापासून शून्य उत्पादन होते.

३१ डिसेंम्बर व १जानेवारी रोजी वरुड मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व गारपीट झाली त्यामुळे संत्रा बहार, हरभरा व गहू तसेच कापूस व तूर याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. थंडी व दवामुळे तसेच गारपिटीमुळे झालेल्या संत्रा, कपाशी, तुरी, हरभरा, गहू नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश द्यावेत व मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी वारंवार घोषित केल्याप्रमाणे २५ हजार रुपये प्रति हेक्टरी व संत्राला ५० हजार रुपये प्रति हेक्टर या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.