विद्यार्थिनींच्या मोठ्या प्रतिसादात महिला सुरक्षेचा जागर सायबर सुरक्षिततेचा संदेश प्रत्येक माताभगिनीपर्यंत पोहोचवा –  पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर

83
जाहिरात

अमरावती,-  सोशल मीडिया हाताळताना प्रत्येकाने लक्ष्मणरेषा आखून घेणे आवश्यक आहे. सतत सजगता हाच सुरक्षिततेचा उपाय आहे. सायबर सुरक्षिततेचा हा संदेश प्रत्येक माताभगिनीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन शहराचे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर यांनी आज येथे केले.
अमरावती शहर पोलीस व सायबर सेलतर्फे जिल्हा माहिती कार्यालय व विविध संस्थांच्या सहकार्याने सायबर सेफ वुमेन या मोहिमेत कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले व  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सायबर सुरक्षेबाबत आवाहनाचा संदेश प्रसारित करण्यात आला. उपमहापौर कुसुम साहू, महिला व बालकल्याण सभापती वंदना हरणे, सुनीता भेले, सुरेखा लुंगारे, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता देशमुख, माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी, दिशा संस्थेच्या ज्योती खांडपासोळे, पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त श्री. बाविसकर म्हणाले की, सोशल मीडिया किंवा कुठलेही माध्यम हाताळताना प्रत्येकाने आपली वैयक्तिकता, खासगी बाबीबद्दलची माहिती गरज नसेल तर शेअर करता कामा नये. आपल्या मर्यादा, जबाबदा-या विसरू नये. पाल्यांनी पालकांना अंधारात ठेवून कुठलीही कृती करू नये. सोशल मीडियातून संपर्कात आलेली अपरिचित व्यक्ती आपल्याविषयी स्नेह का बाळगते, हे तपासणे आवश्यक आहे. संकटे ही आपल्या अवतीभवती, परिसरातही असू शकतात. आपल्याला त्याचा चेहरा ओळखता आला पाहिजे. त्यामुळे आपले भान व सजगता टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
श्री. मुळी म्हणाले की, मोबाईल ही वैयक्तिक वस्तू असून, तिच्यावर आपल्याखेरीज इतरांचे नियंत्रण असता कामा नये. पोस्ट ट्रुथ म्हटल्या जाणा-या आजच्या युगात सत्याचा आभास निर्माण करणा-या वेगवेगळ्या गोष्टी एकाचवेळी समोर येत असतात. अशा वेळी सजग राहून सामाजिक व्यवहार पार पाडण्याची जबाबदारी आपली असते.
श्रीमती देशमुख म्हणाल्या की, आजच्या पिढीची एक पालक म्हणून काळजी वाटावी अशा घटना सभोवती घडत असतात. त्यासाठी सामाजिक वर्तन मर्यादा सोशल मीडियावरही पाळल्या गेल्या पाहिजेत. संस्कारक्षम समाजनिर्मितीसाठी मूल्यांची जपणूक होणे गरजेचे आहे.
दुस-या सत्रात सायबर सेलचे निरीक्षक प्रवीण काळे व श्रीमती खांडपासोळे यांनी कार्यशाळेत पॉवरपाईंट प्रेझेंटेशनद्वारे सायबर सुरक्षा व सार्वजनिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
सायबर ग्रुमिंग, सायबर बुलिंग, मॉर्फिंग, सायबर डिफेमेशन, स्टॉकिंग, ऑनलाईन गेमिंग, फिशिंग, सेक्सॉर्टशन,स्कुटिंग अशा विविध सायबर गुन्हे प्रकारांची माहिती देताना श्री. काळे म्हणाले की, दुर्लक्ष व चुकीच्या बाबी सहन करत राहण्याची वृत्ती या सार्वजनिक व्यवहारांसह सोशल मीडियावरही अत्यंत घातक ठरतात. त्यामुळे कुठलीही आक्षेपार्ह बाब लक्षात येताच तत्काळ पोलीसांना कळविली पाहिजे. समाजमाध्यमे हाताळताना अनोळखी व्यक्तींना फ्रेंड लिस्टमध्ये स्थान देता कामा नये. शेअर केलेल्या माहिती, फोटोला अधिक लाईक मिळण्याची भुरळ पडू देऊ नये. कारण अनेकदा लाईक देऊन गैरहेतूने जवळीक साधण्याचाही प्रयत्न गुन्हेगारी व्यक्तींकडून केला जातो. ब्ल्यू व्हेल, पब्जीसारख्या गेमच्या आहारी गेल्याने तरूणांचे मोठे नुकसान होते. अमरावतीतही एक तरूणी बेपत्ता झाल्याचे प्रकरण घडले आहे. यात महिला व मुलींप्रमाणे बालकांच्या फोटोचाही वापर होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वेबसाईच्या सेंटिंग्जमध्ये जाऊन सिक्युरिटीचे भक्कम पर्याय निवडणे, अनावश्यक माहिती शेअर न करणे, बॅक अप ठेवणे व पालकांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.
श्रीमती खांडपासोळे म्हणाल्या की, दुर्लक्ष व जागरूकतेचा अभाव हे व्यक्ती गुन्ह्यास बळी पडण्यास मुख्यत्वे कारणीभूत असतात. त्यामुळे हे कसे टाळायचे याचे कौशल्य आत्मसात करणे अपरिहार्य आहे. यात पालकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वत:सही मर्यादा घालाव्यात व पाल्यांना तसे मार्गदर्शन केले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनातील हकीकती प्रसृत करण्यास मर्यादा हवी. सोशल मिडीयातून वेट लॉस, सौंदर्य प्रसाधने यांच्या आकर्षक पण फसव्या जाहिरातींचे प्रमाणही मोठे आहे. त्यांना बळी पडू नये. जाणीव, जागृती व जबाबदारी या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.

चाईल्डलाईनचे दिनेश कपूर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांनी प्रास्ताविक केले. पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी आभार मानले. सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती शीतल हेरोळे यांच्यासह विविध पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला शहरातील महिला कार्यकर्ता, विद्यार्थिनी, अधिकारी यांची मोठी उपस्थिती होती. श्री शिवाजी शिक्षण संस्था, दिशा संस्था, चाईल्डलाईन, पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया व विविध शाळा- महाविद्यालयांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।