चार वर्ष झाले शाळेला सुट्टीच नाही पहा कोणत्या गावाची शाळा आहे….

416

भाद्याच्या दोन्ही जि प प्रशालेतील सुट्टीविना उपक्रमास चार वर्ष पूर्ण…

उस्मानाबाद / प्रतिनीधी

भादा (औसा)–एकच दिवस योगदिन का ? ,एकच दिवस औपचारिक कोणतेही दिन पाळायचे व ते दिन पुन्हा बारा महिने दिनवाणे होणार अशा विसंगतीच्या प्रवाहाविरुद्ध, सुसंगतीच्या व सुसंस्काराच्या जीवन प्रणालीसाठी लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील भादा या आडवळणाच्या गावी जि प प्रशाला व जि प कन्या प्रशाला कार्यरत असून ,अडीच डझन पुस्तकाचे लेखक व दोन डझन पुरस्कार प्राप्त असलेले भारत सातपुते हे या दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक आहेत.
रोज योगदिनाचा निर्णय झाला ११ जानेवारी २०१६ पासून अखंडपणे सुट्टीविना उपक्रमशील शाळेची सुरुवात झाली.बघता बघता चार वर्षे पूर्ण झाली.राज्यात किंवा देशभरात आगळावेगळा पॅटर्न निर्माण करणारी ही एकमेव प्रशाला असेल. संसार, भौतिक गरजा, शेती, स्वतःचे कार्यक्रम आदींना बगल देत मुख्यालयी राहून सातपुते कार्यरत आहेत, सकाळी घरगुती जेवण्याचा डब्बा व शाळा सुटल्यावर स्वतः हाताने स्वयंपाक बनवून दिवस काढणारे हे कविमन, पुन्हा रात्री दहावीचा क्लास सुरु होतो, अनेक संकटातून सामोरे जात चार वर्ष सुट्टीविना हा दिर्घ पल्ला गाठला,श्री सातपुते यांनी आज पर्यंत किमान सहाशे दिवस सुट्टीला तिलांजली दिली आहे . साधारण शंभर बाबी येथे नव्याने सुरुवात झाल्या. पहाटे शाळेत मुलांचा व्यायाम ज्यात दोन वर्षापासून मुले सहभागी आहेत. मुली गावातील वेगवेगळ्या भागात व्यायाम करतात. नऊ वाजता ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन, दिवसभर शाळा आणि यात शाळेचा शेवटचा तास विविध उपक्रमाने संपन्न होतो. ज्यामध्ये सोमवारी मुलाखत,चिट्ठी खोला झटपट बोला मंगळवारी ,प्रश्नमंजुषा बुधवारी, स्वरचित कथा-कविता गुरुवारी, सामान्य ज्ञान व गणिती पाढे शुक्रवारी घेतात. दर शनिवारी कवायत व तीन विषयाची आठवडी चाचणी हे गुणवत्ता वाढवणारे उपक्रम आहेत. परिपाठात विद्यार्थी सहभागी तर आहेतच शिवाय रोज अनापान घेतले जाते. प्रेरणा नावाने विद्यार्थी स्वरचित हस्तलिखिताचे सतरा विषेशांक तयार झाले आहेत. दप्तराचे ओझे इथे कमी आहे.स्काऊट गाईडचे सर्वसाधारण विजेतेपद या प्रशालेला लाभले. तर राज्यस्तरावर विज्ञान ,अभिनय, योगासनात ही शाळा चमकत आहे. चार वर्षात राज्याचा कानाकोपऱ्यात सहा वेळा शैक्षणिक सहली अतिशय काटकसरीने कमीत कमी खर्चात निघाल्या.दर्जेदार शालेय पोषण आहार,स्वच्छ शाळा,शेकडो वृक्षांची जोपासना येथे बहरली आहे. दिवाळीला पर्यावरणाचे गावातील घरांना लावलेले संदेश, आजही रांगोळीच्या वेळी मुली वेगवेगळे संदेश देतात. क्षेत्रभेटी,वनभोजन, स्नेहसंमेलनातून गावात शिक्षणाचा स्नेह वृद्धिंगत होतो.वेगवेगळ्या वर्तमानपत्राचा इथे वाचनकट्टा वाचनीय झाला आहे. शाळेने गावानतही झाडे जोपासली आहेत. दहावी परीक्षेचा दरवर्षी 90 टक्केपेक्षा जास्त निकाल लागतोे.आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने खेड्यातील ही प्रशाला निवडली हे या प्रशालेतील सुट्टीविना उपक्रमाची दखलच म्हणावी लागेल. ‘इस्त्रो’च्या भेटीसाठी या प्रशालेतील दोन मुलींची निवड ही या शाळेची धडपड सांगते. चार ही सेवकांची पदे रिक्त आहेत. रोजंदारीवर मजूर लावून शाळेची कामे केली जातात. शाळेत नंदनवन अवतरले आहे. संगणकाचा तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात वापर होतो. शाळेला जोडून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अंगणवाड्या मुलांना बोलक्या करत आहेत शाळेची रंगरंगोटी मार्गदर्शन करणाऱ्या भिंती व घसरगुंडी ,झोके आदी खेळणी मुलांना सुदृढ करत आहेत.जिकडे बघावं तिकडे सुगंध देणाऱ्या तुळशी आहेत. शिष्यवृत्ती,नवोदय ,विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील विविध पुरस्कार शाळेला व शिक्षकांना लाभले आहेत. शिक्षणाच्या अतिउच्च पदव्या शिक्षकांनी संपादन केल्या आहेत. गावातील पालक महिलांच्या इथे वर्षातून एक-दोन वेळा स्पर्धाही ही घेतात.हे यश व्यक्तीचे अथवा एकट्याचे नसून यामध्ये सर्व सहकारी शालेय व्यवस्थापन समितीचे पाचव्यांदा अध्यक्ष असलेले अर्जुन लटुरे,उपाध्यक्ष सतीश कात्रे,सरपंच दिनकर माळी, उपसरपंच बालाजी शिंदे सर्व नागरिक यांच्या सहकार्यातून या प्रशालेची प्रगती होत असल्याची भावना मुख्याध्यापक भारत सातपुते यांनी व्यक्त केलीे आहे.
मुलांच्या गणवेश याबरोबर शिक्षकांचे गणवेश इथे एकतेची साक्ष देतात. हरेक बाबतीत इथे शिस्त आहे. चार वर्षात दोन वेळा पाच-सहा मिनिटाचा उशीर परीपाठासाठी झाला तर दिवसभराची किरकोळ रजा घेऊन कार्यरत राहणारे भारत सातपुते आहेत.तसे बोर्डाच्या परीक्षेतील सातपुते यांचे कार्य जगावेगळे आहे.कारण त्यांनी दहावी-बारावी, डीएड परीक्षेत आजतागायत सत्तरच्या आसपास रेस्टतिकीट केले असून सात विद्यार्थ्यांवर तोतयागिरीचे गुन्हे दाखल केले आहेत.सर्व धोके पत्करून धाडसीपणाने सातपुते कार्यरत राहतात तसे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले हे व्यक्तीमत्व तिळभर ही कर्तव्यापासून दुरावले नाही.प्रतिकुल परिस्थितीत संघर्ष करणे हा सातपुते यांचा स्थायीभाव आहे. म्हणूनच भादा प्रशालेस विविध क्षेत्रात राज्यभर आगळावेगळा ठसा उमटवता आला. पायाभूत ज्ञान पक्के करत इथे ज्ञानाची इमारत उंचावते आहे.कोठेही ही आढळणार नाही अशी इथे परीक्षा पद्धती आहे. विद्यार्थ्यांना शंभर पैकी साठ मार्क मिळाली हे सांगण्याची प्रचलित व्यवस्था आहे .पण चाळीस मार्काचे काय चुकले याकडे सर्रास दुर्लक्ष होते. ते इथे सुधारले आहे. विद्यार्थ्यांनीच प्रश्नपत्रिका तपासायच्या व गुणदानही करायचे नंतर शिक्षकांनी चुकलेली उत्तरे दुरुस्त करून विद्यार्थ्याकडून घ्यायची त्यामुळे ज्ञानाची संकल्पना दृढ होते असे सातपुते म्हणतात.
दिवसाच्या चोवीस तासांपैकी किमान पंधरा तास भारत सातपुते शाळेत कार्यरत राहतात. शाळा भरण्यापूर्वी आठवड्यातून एक तास शिक्षक ही वेगवेगळ्या उपक्रमांना हजेरी लावतात व हाक मारताच तेही सुट्टीत आपला वेळ देतात.
अशी ही सुट्टीविना शाळा अखंडपणे उपक्रमांचा वसा घेऊन चार वर्ष पूर्ण करत पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे याबद्दल सर्व स्तरातून या दोन्ही प्रशालेचे अभिनंदन होत आहे.