कर्जमुक्ती योजनेकरीता कालमर्यादेत आधार सिडींग करा  विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले निर्देश  बँकर्ससोबत आढावा बैठक

0
650
Google search engine
Google search engine

कर्जमुक्ती योजनेकरीता कालमर्यादेत आधार सिडींग करा
 विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले निर्देश
 बँकर्ससोबत आढावा बैठक
यवतमाळ दि.15 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरीता जिल्ह्यातील पात्र शेतक-यांच्या बचत खात्यांचे आधारसिडींग मर्यादीत वेळेत होणे गरजेचे आहे. त्याकरीता बँकेच्या व्यवस्थापकांनी आपल्या संबंधित शाखांना सुचना द्याव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार व-हाडे, सहाय्यक जिल्हा निबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते. या योजनेचा लाभ घेण्याकरीता पात्र शेतक-यांच्या खात्याचे आधार सिडींग हा महत्वाचा घटक आहे, असे सांगून श्री. पियुष सिंह म्हणाले, बँकेच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष फिल्डवरून याबाबत दररोज माहिती घ्यावी. आधार सिडींगबाबत स्थानिक स्तरावर बँकेच्या काही समस्या असतील तर महसूल प्रशासनाने बँकांना मदत उपलब्ध करून द्यावी. आधार सिडींगसोबतच नमुना – 2 मध्ये अपलोडींगसुध्दा महत्वाचा भाग आहे. या दोन्ही प्रक्रिया नियमित करा. या योजनेंतर्गत शेतक-यांचे अधिकृत नोंदणीसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ व्यतिरिक्त ई-पॉस मशीन, तलाठ्यांकडील लॅपटॉप आदींचा उपयोग करता येईल का, याची प्रशासनाने पडताळणी करावी. डाटा संकलन किंवा कनेक्टिव्हीटीच्या काही समस्या असेल तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात, जेणेकरून दिलेल्या वेळेत या योजनेचे काम पूर्ण करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पात्र शेतक-यांच्या बचत खात्यांपैकी आता 10 हजार 755 खात्यांचे आधार सिडींगचे काम बाकी आहे. यात राष्ट्रीयकृत बँकांचे 8827 खाते, खाजगी व व्यावसायिक बँकांचे 92, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे 1820 आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 16 खात्यांचे आधार सिडींग शिल्लक आहे. जिल्ह्यात सर्व बँकेच्या एकूण 1 लक्ष 37 हजार 915 बचत खात्यांपैकी 1 लक्ष 5 हजार 831 खात्यांचे आधारसिडींग यापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. प्रलंबित 32 हजार 84 खात्यांपैकी आजघडीला 21 हजार 329 खात्यांचे आधारसिडींग प्रक्रियेमध्ये आहे. तर 10 हजार 755 खात्यांचे काम बाकी आहे.
यावेळी श्री. पियुष सिंह यांनी ‘पीएम किसान’ अंतर्गत शेतक-यांची नोंदणी तसेच प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणा-या ‘शिवभोजन’ योजनेचा आढावा घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी सर्वश्री अनिरुध्द बक्षी, डॉ. शरद जवळे, स्वप्नील कापडनीस, शैलेश काळे, व्यंकट राठोड, इब्राहिम चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक सुबोध बन्नोर यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००००००