समाजसेवेचा वसा आयुष्याच्या अखेर पर्यंत सोडणार नाही – पंकजाताई मुंडे

0
1144
Google search engine
Google search engine

मुंडे साहेबांच्या नावांमुळेच वंचितांसाठी अनेक चांगली कामे करू शकले

मेहगांवला संत भगवानबाबा मंदिर परिसरात साकारले लोकनेत्याचे स्मृती मंदिर ; थाटात झाले लोकार्पण

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

औरंगाबाद दि. २८ — लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे नेतृत्व संघर्षातून पुढे आलेले आहे, सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या नेत्याने केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारली, ती केवळ तुमच्या आशीर्वादामुळे, त्यांनी दिलेला समाजसेवेचा वसा मी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत सोडणार नाही असे सांगत पंकजाताई मुंडे यांनी ‘गोपीनाथ मुंडे’ नांवात मोठी ताकद आहे, त्यामुळेच मंत्री असताना अनेक चांगले निर्णय मी घेऊ शकले अशा शब्दांत आज येथे आपल्या भावना व्यक्त केल्या.

मेहगांव ता कन्नड येथे संत भगवानबाबा मंदिर परिसरात गावक-यांनी एकत्रित येऊन साकारलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती मंदिराचा लोकार्पण सोहळा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. हरिभाऊ बागडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. उदयसिंह राजपूत, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डाॅ भागवत कराड, प्रवीण घुगे, पं. स. सभापती आप्पाराव घुगे, भगवानबाबा मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुधीर घुगे, मेहगांवचे सरपंच पांडूरंग घुगे, जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप, सतीश नागरे आदी यावेळी उपस्थित होते.

मुंडे साहेब संत भगवानबाबांचे निस्सिम भक्त होते, आपण त्यांना मंदिरात स्थान दिले त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे असे सांगून पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या की, याठिकाणी मी अनेक वेळा आले, माझ्या संघर्षयात्रेचे आपण जंगी स्वागत केले होते, सत्तेच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे मी इथे केली, मंदिराला निधी दिला, आता त्याचे भव्य स्वरूप पाहून आनंद वाटला, भविष्यात आणखी भव्य रूप देऊ.

मुंडे साहेबांनी आयुष्यभर वंचित घटकांसाठी काम केले, संघर्ष केला, तुम्ही त्यांच्यावर मनापासून प्रेम केले, सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या नेत्याने केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारली, हे केवळ तुमच्या आशीर्वादामुळे..त्यांचा वारसा पुढे नेत असताना त्याच्या जबाबदारीचे भान मला आहे. मी त्यांचे नांव जगाला विसरू देणार नाही अशी शपथ घेतलीय, ती फक्त तुमची सेवा करण्यासाठी..आणि म्हणूनच गोपीनाथ मुंडे हे नांव लावून तशीच सही करण्याचा निर्धार केला, मंत्री म्हणून अनेक चांगले निर्णय मी त्यामुळेच घेऊ शकले.

सर्वसामान्य जनता हिच संपत्ती

गोपीनाथ मुंडे या नांवात मोठी ताकद आहे, केवळ या नांवाने सर्व सामान्य माणसाला आजही आनंद, धीर आणि आधार वाटतो, त्यांच्या पश्चात सर्व सामान्य माणूस हिच माझी संपत्ती आहे. या संपत्तीवर कुणीही दावा करू शकत नाही, तसे करण्याचा काही लोक प्रयत्न करतात, पण त्यांना यश मिळत नाही. तुमची शक्ती ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, कारण तुमच्यात मुंडे साहेबांचे रूप मला दिसते, संकट आणि दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती मला मिळते, तुमच्या मनात जोपर्यंत माझे स्थान अढळ आहे, तोपर्यंत काम करत राहीन. माझ्या सत्कारासाठी यापुढे हार, तुरे आणू नका, फक्त आशीर्वाद द्या, यातूनच मला जग जिंकण्याची ताकद मिळते असे पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.

प्रारंभी पंकजाताई मुंडे यांचे ग्रामस्थांनी वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले. संत भगवानबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुंडे साहेबांच्या पुतळ्याचे त्यांनी अनावरण केले. पंचक्रोशीतील पुरूष व महिला भाविक भक्त तसेच आबालवृद्ध यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बजाज नगरातील चौकाला मुंडे साहेबांचे नाव

औरंगाबाद येथे वाळूज महानगर (बजाज नगर) परिसरातील चौकाला ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब चौक ‘ असे नांव देण्यात आले आहे, या चौकाचा नामकरण सोहळा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मेहगांवला जाण्यापूर्वी सकाळी मोठ्या थाटात झाला. यावेळी त्यांचे रहिवाशांनी वाजत गाजत जंगी स्वागत केले. संत भगवानबाबांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. मुंडे साहेबांच्या विचाराचा वसा पुढे चालू ठेवल्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करते. तुमची सेवा करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करत राहणार आहे. मला कोणत्याही पदापेक्षा गोपीनाथ मुंडे हे नांव माझ्यामागे आहे हे महत्वाचे आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा करणे हेच माझे ध्येय असल्याचे त्या म्हणाल्या. लोकनेता फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला.