*35 नागरिकांचे थ्रोट स्वॅब निगेटिव्ह :- घाबरू नका, दक्षता घ्या  –  Amravati जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

0
3688
Google search engine
Google search engine

 

अमरावती:  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी, होम क्वारंटाईन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा होत असून, आता एसटी, रेल्वे व खासगी प्रवासी यांचीही तपासणी केली जात आहे. कालपर्यंत 35 नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्व नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  केले आहे.

काल 11 व व तत्पूर्वी 24  थ्रोट स्वॅब असे 35 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे, आजपासून रेल्वे, एस. टी. व खासगी बसमधील प्रवाश्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आवश्यक दक्षतेबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. आज 10 नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याबाबत अहवाल प्रलंबित आहेत.

 

परदेशातून आलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.  या पथकांकडून संबंधितांची तपासणी, त्यांना होम क्वारंटाईनबाबत सूचना देण्यात येत आहेत. परदेशातून परतलेल्या सर्व नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असून, त्या नागरिकांनी स्वत:हून माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

परदेशातून येणा-या नागरिकांची विमानतळावर तपासणी होत आहे. लक्षणे आढळलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती केले जात आहे. जिल्ह्यातही पथकांकडून घरोघर जाऊन प्रवाश्यांची तपासणी, आवश्यक सूचना व संपर्क ही प्रक्रिया सुरुच आहे.  या पथकांकडून संबंधित सर्व नागरिकांची रोज विचारपूस करण्यात येत आहे. संबंधितांच्या कुटुंबियांनाही दक्षतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आजाराची कुठलीही लक्षणे आढळल्यास स्वत:हून संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.