* अमरावती ब्रेकिंग करोना अपडेट :- चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

0
4706
Google search engine
Google search engine

अफवा पसरविणा-यांवर प्रशासनाची करडी नजर

 

अमरावती : सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मंडळ अधिका-यांच्या तक्रारीवरून ग्रुप ॲडमिन व ग्रुप सदस्य व्यक्तीविरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना आजाराबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून किंवा इतरही प्रकारे अफवा पसरविल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार पोलीस, सायबर सेल, प्रशासन यांच्याकडून अशा प्रकरणी गंभीर दखल घेऊन कारवाई केली जात आहे. त्यानुसार ‘बदलाव मेलघाट मे’ या व्हाटस ॲप ग्रुपच्या माध्यमातून अफवा पसरवली जात असल्याचे निदर्शनास आल्यावरून धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धारणी तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी सीताराम कासदेकर यांनी ही तक्रार दाखल केली. त्यानुसार ‘बदलाव मेलघाट मे’ या व्हाटस ॲप ग्रुपवर मौजे धारणमहू या गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची चुकीची माहिती 7620554711 या क्रमांकावरून प्रसारित करण्यात आली. या माहितीसह एका व्यक्तीला डॉक्टर तपासत असल्याचे छायाचित्रही प्रसारित करण्यात आले. प्रत्यक्षात सदर छायाचित्रातील व्यक्ती ही रुग्ण नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तो एक सर्वसाधारण तपासणीचा फोटो आहे. असे असतानाही चुकीची माहिती प्रसारित करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार धारणी तहसीलदारांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून ग्रुप ॲडमिन व संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आवश्यक ती माहिती आरोग्य प्रशासनाकडून अधिकृतरीत्या वेळोवेळी जाहीर करण्यात येत आहे. अफवा पसरविल्यामुळे समाजात घबराट निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेवर ताण येतो.  त्यामुळे अशा प्रकाराची गंभीर दखल घेतली जात आहे. त्यामुळे कुणीही अफवा पसरविण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, नागरिकांनी या अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाने केलेल्या स्वच्छताविषयक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.