*अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करू – जिल्हाधिकारी शैलेश नवाल*

0
1825
Google search engine
Google search engine

अमरावती :- कोरोना विषाणू संसर्गाबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून किंवा इतरही प्रकारे अफवा पसरविल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे.

_जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही रूग्ण नसतानाही तसे असल्याच्या बातम्या काही खोडसाळ व्यक्ती मुद्दामहून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत. चुकीची माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला आहे_.

शासनाकडून वेळोवेळी वस्तुनिष्ठ व अधिकृत माहिती प्रसृत केली जात आहे. एखाद्या व्यक्तीची तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाला नसतानाही तो रूग्ण असल्याचे दर्शवून चुकीची माहिती पसरविण्याचे प्रकार घडत आहेत. काही घटनांमध्ये विशिष्ट व्यक्तींची नावे खोडसाळपणे संशयित रूग्ण म्हणून पसरविण्यासारखे अपप्रकारही घडत आहेत. अशा अफवांमुळे होणारी सामाजिक हानी लक्षात घेता अफवा पसरविणा-याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.