*रेशन धान्य खरेदीचा व्हायरल झालेला फॉर्म बनावट – अन्न,नागरी पुरवठा विभागाचा खुलासा*

0
1685
Google search engine
Google search engine

अफवांना बळी पडू नका _जिल्हा प्रशासनाचे आवाहन_

अमरावती :  रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सध्या सोशल मिडियावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नाही. नागरिकांनी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये व फसवणूक टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म  उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहेत.  सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागानेही तसे स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे.

सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तू सर्वांना मिळण्यासाठी विविध निर्णय घेतले आहेत. कुठलाही नागरिक जीवनावश्यक वस्तू मिळण्यापासून वंचित राहणार नाही. शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागांकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी शासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.