कडेगांव पोलिसांनी दुचाकीस्वारांना घडवली अद्दल

Google search engine
Google search engine

कडेगाव : प्रतिनिधी
कोरोनाची दहशत संपूर्ण देशाने व जगाने घेतली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस दिवसरात्र लोकांच्या सेवेसाठी काम करीत आहे. परंतु याचे कोणतेही गांभीर्य नसलेल्या हुल्लडबज तरुण व काही बेजबाबदार लोकांना कडेगाव पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली .
शासनाच्या आदेशाचा भंग करत डबल सीट मोटार सायकलवरून प्रवास करणाऱ्या शंभरहून अधिक दुचाकीस्वारांना व निव्वळ हिंडणाऱ्या फाळकुट तरुणांना कडेगाव पोलिसांनी बस स्थानक आवारात रणरणत्या उन्हात तब्बल दीड ते दोन तास बसवून ठेवले आणि त्यांना एक संधी देत पुन्हा शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही याबाबत त्यांच्याकडून शपथ घेतली. दरम्यान पोलिसांच्या या शिक्षेचा वेगळाच ठसा आज कडेगांव शहरात चांगलाच चर्चेत आला. तर पोलिसांच्या या कृतीचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी कौतुक केले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर मागील महिना भरापासून शहरासह तालुक्यात लॉक डाऊन आहे. कोरोनाची धास्ती अख्या जगाने घेतली आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. प्रशासन आपापल्या परीने कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येते परंतु हुल्लडबाज अजूनही शहाणे झाले नाहीत. त्यांची उद्दाम वागणूक सुरूच आहे. याला चाप लावण्यासाठी कडेगाव पोलीस विविध उपाय करीत आहेत. इस्लामपूर येथिल रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडेगाव शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. पुढे भविष्यातही तालुका कोरोना मुक्तच असावा यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून विविध उपाय योजले जात आहेत.
दरम्यान आज सकाळी कडेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे ,जालिंदर जाधव व पोलीस सहकाऱ्यांना सोबत घेऊन, हुल्लडबाज तरुण व डबल सीट वाहनधारकांची धरपकड केली. यावेळी शंभर पेक्षा अधिक वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. या सर्व वाहनधारकांना बसस्थानक आवारात रणरणत्या उन्हात तब्बल दीड तास बसवून घेतले. यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी कायद्याचे पालन करणाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. त्यांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी वाहनधारकांना शासनाच्या आदेशाचे पालन करेन अशी शपथ दिली.