कडेपूर येथील यात्रा रद्द : यात्रेचा निधी कोरोना मदत निधीसाठी : प्रशासनाकडून उपक्रमाचे स्वागत!!

Google search engine
Google search engine

सांगली/ कडेगाव
कडेपूर येथील ग्रामदैवत वडलाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेसाठी खर्च करण्यात येणारे पैसे पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते पंचवीस हजार रूपये निधीचा धनादेश तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांच्याकडे देण्यात आला. ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे प्रशासनाने कौतुक केले आहे.
कडेपूर ग्रामदैवत वडलाई देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यात्रेसाठी लोकवर्गणी जमा केली जाते. मात्र सध्य परिस्थिती मध्ये देशात कोरोना रोगाचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत यात्रा साजरी केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी चालू वर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
यात्रेमध्ये पालखी सोहळा व इतर कार्यक्रमासाठी खर्च करण्यात येणारे पैसे पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी १५ हजार रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० हजार रुपये मदत निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर मदत निधीचा धनादेश भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते तहसीलदार यांच्याकडे सफूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले, कोरोना रोगाने जगभर थैमान घातले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगल्या प्रकारे परिस्थिती हातळली आहे. त्यामुळे आपल्या राज्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखता आला आहे. हे महाभयंकर संकट परतवून लावण्यासाठी सर्वांनी शासनाला मदत केली पाहिजे. सर्वांनी घरात सुरक्षित राहिले पाहिजे. कोणीही विनाकारण घरातून बाहेर पडले नाही पाहिजे. तसेच शक्य आहे अशा लोकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदत द्यावी. असे आवाहन केले.
तहसीलदार डॉ. शैलजा पाटील म्हणाल्या, कोरोना रोगाच्या साथीच्या परिस्थिती मध्ये कडेपूर ग्रामस्थांनी यात्रा रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. तसेच यात्रेसाठी खर्च केले जाणारे पैसे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. इतर गावातील लोकांनी याचा आदर्श घ्यावा. असे आवाहन केले.
यावेळी सरपंच रूपाली यादव, हर्ष पॉलिमर्स कंपनीने चेअरमन नेताजीराव यादव, माजी सरपंच पंजाब यादव, सदस्य लालासाहेब यादव, अमर यादव, सुरेश यादव, संपतराव देशमुख सोसायटीचे चेअरमन धनाजी यादव, अनिल यादव, संग्राम यादव, राजकुमार पाटील, मोहन यादव, अविनाश यादव, निलेश यादव, मनोज यादव, विजय क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.