अमरावतीमध्ये रूग्णवाहिका पळविणाऱ्या आरोपीने चांदूर मधून सुमो नेली चोरून – आरोपीला अटक

0
5305
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
अमरावती मध्ये एक वेळा रूग्णवाहिका पळवून दुसऱ्यांदाही रूग्णवाहिका पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने चांदूर रेल्वेत सुध्दा असाच पराक्रम करण्याचा प्रयत्न केला. अमरावतीवरून चांदूर रेल्वे शहरात येऊन घरासमोर उभी असलेली टाटा सुमो घेऊन फरार झाला होता. अखेर टाटा सुमो मिळून आली असुन आरोपीला सुध्दा अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली व सोमवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. आरोपी हा मनोरूग्ण असल्याचे समजते.
स्थानिक शिवाजीनगर मधील रहिवासी सुजित वसंतराव जगताप यांच्या मालकीची टाटा सुमो क्रमांक एमएच २३ वाय १६५३ दररोज घरासमोर उभी असते. अशातच मध्यरात्रीच्या दरम्यान आरोपी धर्मेंद्र अभय कठाडे (४५, रा. चंद्रपूर) याने घरासमोरून वाहन चोरून नेले. फिर्यादी व साक्षीदारांनी सकाळी वाहनाचा शोध घेतला असता सदर वाहन शहरातील खडकपुरा येथे आरोपी सह मिळून आले. यानंतर सदर आरोपीला ताब्यात घेऊन पोलीसांनी आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार दिपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मोतीराम पवार करीत आहे. याच आरोपी मनोरुग्णाने २३ एप्रिलला अमरावती इर्विन रुग्णालयातून रूग्णवाहिका (सुमो) पळविली होती. तेव्हा त्याला बडनेऱ्यात पकडले होते. यानंतर पुन्हा इर्विनमधूनच २५ एप्रिल ला पहाटे शासकीय १०८  रुग्णवाहिका सुद्धा पळविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तो रूग्णवाहिका पळविण्यात अपयशी ठरला. त्यानंतर आता याच मनोरुग्णाने चांदूर रेल्वे शहरात येऊन आपला पराक्रम गाजविला आणि सुमो पळविली. परंतु सुदैवाने सुमो शहरात थोड्या दुरवर जाऊन बंद पडल्याने गाडी तेथेच थांबवुन आरोपी त्यामध्येच झोपला होता.
मनोरूग्ण चांदूर रेल्वेत कसा पोहचला ? 
मनोरूग्ण अमरावती मध्ये असतांना तो चांदूर रेल्वेत कसा पोहचला असा सवाल निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी सुमो पळवून शहरातच फिरवली असतांनाही पोलीसांच्या लक्षात आले नाही. यावरून पोलीसांच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित होत असुन लॉकडाऊनमध्ये चोऱ्यांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. यापुर्वी चमकुरा ढाबा, जलाराम रिपेयरींग मध्ये सुध्दा चोरीच्या घटना रात्रीच्या घडल्या असुन याचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे