*बालकांच्या योग्य वाढ व विकासाकरिता पोषण आहाराचे महत्व*

0
3178
Google search engine
Google search engine

 

_राष्ट्रीय पोषण माह हा सप्टेंबर महिन्यात देशभर पाळला जातो. यानिमित्त अमरावतीच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी ज्योतीताई कन्नाके यांचा माहितीपूर्ण लेख._

यंदा पोषण आहार महिन्यानिमित्त गंभीर तीव्र कुपोषण असलेल्या मुलांची ओळख्‍ पटविणे आणि पाठपूरावा करणे” तसेच “पोषण बाग विकसित करणे” हे ध्येय ठरविण्यात आले आहे. राष्ट्राच्या उत्तम उभारणीसाठी बालकांची जडणघडण योग्यरित्या होणे ही काळाची गरज आहे. बाळ मातेच्या गर्भात असते तेव्हापासून आणि जन्मल्यानंतर त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे ते गंभीर कुपोषणाला बळी पडणार नाही. बाळ गर्भात असताना मातेने सर्व पोषक घटक असलेला आहार, विहार, विश्रांती आणि सकारात्मक विचार बाळगले तर गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यास मदत होते.

बाळाने जन्मानंतर एका तासाच्या आत पहिले स्तनपान घ्यावे अशी शिफारस युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि शास्त्रज्ञांनी केली आहे. त्यामुळे अविकसित देशांमधील एक महिन्याच्या आतील बाळाचे होणारे 22 टक्के मृत्यू टाळता येतील. जन्मानंतर पहिल्या तासात बाळ खूप सावध आणि सतर्क असतो. तो आपणहून कृती करण्यास उत्सुक असतो. मातेच्या जवळ बाळाला ऊब मिळते आणि मेंदूचा विकास होण्यास चालना मिळते. त्याला आईपासून उपयुक्त जंतु मिळतात, त्यामुळे जंतुसंसर्गापासून संरक्षण मिळते. या अवस्थेत बाळ स्वत:हून हालचाल करत स्तनपान करण्यास उत्तेजित होतो आणि त्याला ऊब, प्रेम. सुरक्षा व अन्नही मिळते. आई व बाळात प्रेमाचे बंध दृढ होतात. एका तासाच्या आत बाळाला मिळणारे स्तनपान ही बाळाची पहिली लस समजली जाते. याव्दारे बाळाला अन्न तर मिळेलच, सोबत त्याच्या आरोग्याचे संरक्षण होईल. रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

बाळ 6 महिन्यांचे होईपर्यंत निव्वळ स्तनपान करावे आणि त्यानंतर मऊ, थोडासा जाडसर असा पुरक आहार सुरु करावा. त्यामुळे बाळाचे योग्य प्रमाणात वजन वाढण्यास मदत होते. आणि टप्पया टप्पयाने वाढ आणि विकास होण्यास मदत होते.

बाळाचे वय 6 महिने ते 2 वषे असल्यास मातेने किमान 5 ते 6 वेळा आणि 2 ते 5 वर्षामध्ये साधारणत: 2 ते 3 वेळा स्तनपान सुरु ठेवणे अपेक्षित आहे. शास्त्रीय माहिती नुसार कमीत कमी 2 वर्षापर्यंत पुरक आहाराच्या जोडीला स्तनपान द्यावे. त्यानंतरही बाळ 5 वर्षाचे होईपर्यंत थेडया प्रमाणात आईचे दुध मिळाल्यास त्यातील प्रतिकार शक्तीमुळे बाळाला जंतुसंसर्गाची शक्यता कमी होते. 5 वर्षानंतरच मुलांची प्रतिकारशक्ती मोठ्या माणसांप्रमाणे होते.

वय आणि पुरक आहाराच्या टक्केवारीप्रमाणे स्तनपान केल्यास बाळाची वाढ योग्यरित्या होण्यास मदत होते. जसे की,

· बाळाचे वय 6 ते 9 महिने असल्यास 70 टक्के स्तनपान करावे आणि 30 टक्के पुरक आहार दयावा.

· बाळाचे वय 9 ते 12 महिने असल्यास 50 टक्के स्तनपान करावे आणि 50 टक्के पुरक आहार दयावा.

· बाळाचे वय 12 ते 24 महिने असल्यास 30 टक्के स्तनपान करावे आणि 70 टक्के पुरक आहार दयावा.

बाळ 12 महिन्यांचे झाल्यानंतर ब-याच माता स्तनपान बंद करुन केवळ वरचा आहार सुरु ठेवतात. परंतु दुस-या वर्षातील स्तनपानाचे महत्व काय आहे हे सुध्दा समजून घेणे गरजेचे आहे.

दुस-या वर्षात 35 ते 40 टक्के उष्मांक मातेच्या स्तनपानातून मिळतात. मातेच्या दुधात स्निग्धांचे प्रमाण पुरक आहारापेक्षा जास्त असल्यामुळे स्निग्धांश व उर्जा यासाठी स्तनपान महत्वाचा स्त्रोत आहे. स्निग्धांश जास्त असल्यामुळे ”अ” जीवनसत्वाच्या शेाषणासाठी मदत होते. तसेच बाळाच्या आजारपणात बाळ अन्नापेक्षा स्तनपान घेणे पसंत करतो. त्यामुळे काही प्रमाणात द्रव पदार्थ्, उष्मांक आणि पोषक तत्वे हमखास मिळतच असतात, शिवाय प्रतिकार शक्ती मिळत राहिल्याने बाळ लवकर बरे व्हायला मदत होते. त्याला कुटुंबियांसोबत भरवावे. भरवताना त्याच्याशी संवाद साधत, गाणी म्हणत भरवावे, पूरक आहार काय दिला जातो, यासोबतच कसा, केंव्हा आणि कोण देतो हे देखिल महत्वाचे आहे.

योग्यरित्या वाढ होण्यासाठी 10 प्रकारचे अन्न गट सांगितले आहेत.

1) तृणधान्ये: बाजरी, ज्वारी यामध्ये लोहाचे आणि तंतुपदार्थांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रोज गव्हाची पोळी न देता आठवडयातून 2-2 दिवस बाजरी, ज्वारीची भाकरीसुध्दा होणे आवश्यक आहे.

2) कडधान्ये: म्हणजे व्दिदल धान्ये. जसे की, तूर, मूग, मटकी, हरभरे, मसूर, चवळी, वाटाने, वाल, पोपट इत्यादी. बरेचदा तूर डाळींचे वरण किंवा आमटी केली जाते परंतु तूर डाळीला साल नसल्यामुळे आपण तंतुमय पदार्थांना मुकतो. शेंगदाणे, सोयाबीन या तेलबीया सुध्दा अन्न गट 2 मध्येच मोडतात. म्हणून याचा नियमित वापर केल्याने पोषक घटकांची प्रत वाढविता येते. शक्य होत असल्यास काजू, बदाम, पिस्ते, मनुका यांचाही वापर करता येईल, याच अन्न गटात करता येईल. 3:1 या प्रमाणात कडधान्ये आणि तृणधान्ये एकत्रित करुन अन्न पदार्थ तयार केल्यास जेवनात प्रथिने अधिक मिळतील.

3) “अ” जीवनसत्व: हे फार कमी भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये उपलब्ध आहे. पिवळी आणि केशरी फळे तसेच पालेभाज्या यामध्ये हे प्रमाण जास्त असते. जसे की, गाजर, पिवळा आंबा, पिवळा भोपळा. गर्भवती मातेने 6 महिण्यानंतर दररोज एक गाजर सेवन करणे उत्तम राहील. तसेच “अ” जीवनसत्वाचे शोषण जेवणाबरोबर (स्निग्ध पदार्थांबरोबर) चांगले होते. म्हणून आंब्याप्रमाणेच पपईची फोडही जेवताना सोबतच घेणे उत्तम राहील.

4) इतर भाज्या: उदा. कोबी, प-लॉवर, दुधी, पडवळ, ढोबळी मिरची, गवार, वांगे, सुरण, तोंडली, कारले, नवलगोल, घेासाळ केळफुल, फणस, परसबीन, भेंडी, इत्यादी

5) दुग्धजन्य पदार्थ: यांचा समावेश साधारणपणे दही, ताकाच्या स्वरुपात मोठयांच्या आहारात असतोच पण बाळाला सर्दी होईल या भीतीने पूरक आहारात वापरले जात नाही. पण नुकतेच विरजलेले ताजे दही, ताजे ताक, घरगुती लोणी व साजूक तूप आणि पनीर यांचा वापर योगय प्रमाणात होणे आवश्यक आहे. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. बाळाच्या योग्य वाढीसाठी, गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी हे अतिशय उत्तम आहे.

6) अंडी: यामध्ये देखिल प्रथिने आणि जिवनसत्वांचे प्रमाण भरपूर आहे. बाळ 9 महिण्यांचे पूर्ण झाल्यानंतर त्याला रोज अंडे दिल्यास त्याच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.

7) चिकन, मासे, मटण: मासाहारी कुटुंबामध्ये या प्रत्येक पदार्थांचा वापर आठवडयातून एकदा तरी केल्यास लिव्हर व कलेजीमध्ये लोह व अ जीवनसत्व मिळेल.

8) “क” जीवनसत्व: लिंबू, आवळा, पेरु, मोरावळा हे “क” जीवनसत्वाचे फळे आहेत. जेवनात आणि नाश्ता करताना लिंबाचा वापर केल्यास “क” जीवनसत्व मिळते. पदार्थ शिजविताना लिंबू पिळू नये अन्यथा “क” जीवनसत्व नष्ट होईल, म्हणून ते नंतर पिळावे.

9) लोह: ब-याच घरात पालेभाज्या रोजच्या रोज होत नाहीत कारण त्या निवडायला आणि स्वच्छ करायला वेळ लागतो. काहींना भाज्यांची चव आवडत नाही पण त्या चविष्ट बनवून खाल्यास योग्य वाढीसाठी लोह उपयुक्त ठरेल.

बाळ 6 महिन्यांचे होई पर्यंत मातेच्या दूधातून लोहाची गरज भागविली जाते. हिरव्या पालेभाज्या, गूळ, खजूर, मनुका यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. लोखंडाच्या कढईत अन्न शिजविल्यास लोहाचे प्रमाण वाढते. जेवताना लिंबाचा वापर केल्याने अन्नातील लोहाची मात्रा वाढते.

10) “ड” जीवनसत्व: सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे. हिवाळयात 10.00 ते 10.30 वाजताचे तर उन्हाळयात 7.00 ते 8.30 वाजताचे कोवळे उन घेतल्यास ”ड” जीवनसत्व मिळेल. त्वचेला सूर्य किरणांचा स्पर्श झाला तरच फायदा होईल. बाळाला उघडे ठवून सकाळचे कोवळे ऊन दाखवावे.

स्निग्धांश: मोठयांपेक्षा लहान मुलांना जास्त स्निग्धाशांची आवश्यकता असते, त्यामुळे लहान मुलांना जास्त तूप, लोणी दयावे. हे शक्य नसल्यास तेलबिया जसे की, शेंगदाणे, खोबरे, तीळ आणि सोयाबिनचा वापर खाद्यपदार्थात करावा.

टॉनिक, जीवनसत्वे आणि दूधात घालण्याचे पदार्थ: हे दिल्याने मुलांचे वजन वाढत नाही, त्यांना भूक लागत नाही. त्यामुळे बालक सुदृढ होण्यासाठी या प्रकारांवर अवलंबून राहू नये.

जस्त: जस्ताची कमतरता असल्यास न्युमानिया आणि जुलाब होण्यास जंतूसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. हा धोका जन्मत: कमी वजन असणा-या बाळांना अधिक असतो.

पाणी: पहिले सहा महिने बाळ फक्त आईच्या दूधावर असताना त्याला पाण्याची गरज भासत नाही. त्यानंतर बाळ पुरक आहार घेऊ लागल्यावर मात्र त्याला पाणी दयावे. 10 मिनिटे उकळून गार झालेले पाणी बाळाला पिण्यास दयावे. असे पाणी जंतूविरहीत असते.

अशा प्रकारे 10 अन्न गट सांगितले आहेत. शरीराचे पोषण करण्यास बरेचदा दररोज हे घेणे शक्य नसेल तरीही 4 ते 5 अन्न गट रोजच्या जेवणात असणे अत्यावश्यक आहे.

आपल्या समाजात बरेच गरीब कुटुंब आहेत. प्रत्येकांना दररोज फळ भाज्या आणि फळे घेणे शक्य नाही तेंव्हा घरी ‍जिथे पाण्याचा निचरा होतो अशा ठिकाणी पालेभाज्या आणि फळ भाज्यांची परसबाग विकसीत करावी ज्यामुळे घरच्या घरी निघणा-या भाज्यांच्या उत्पादनामुळे लोह आणि जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता भरुन काढता येईल. एकंदरीत बालकांचे आणि समाजाचे पोषण होण्यास मदत होईल.

– *श्रीमती ज्योती के. कन्नाके*,
जिल्हा विस्तार व माध्यम आधिकारी, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अमरावती