गोडाऊनमधून नाफेडची ९.२२ लाखांची तुर चोरी – शटरचे दोन कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश

0
821
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
चांदूर रेल्वे तालुक्यातील टेंभुर्णी शिवारातील बालाजी वेअर हाऊसमधील गोडाऊन क्र. २ मधून नाफेडचे  ३१८ पोते तुर (किंमत अंदाजे ९ लाख २२ हजार रूपये) चोरून नेल्याची घटना २ सप्टेंबर च्या दुपारी ४ ते ३ सप्टेंबरच्या सकाळी ९.४५ वाजताच्या दरम्यान घडली.
कुऱ्हा रोडवरील टेंभुर्णी शिवारात असलेल्या बालाजी वेअर हाऊस गोडाऊन क्र. २ चे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लोखंडी शटरचे दोन कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये प्रत्येकी ५० किलो वजनाचे ३१८ तुरीचे पोते (१५९ क्विंटल) किंमत ९ लाख २२ हजार लंपास केले. ही बाब महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ केंद्राचे साठा अधिक्षक कृष्णा गुलाबराव धनजोडे (५७) यांना ३ सप्टेंबरला सकाळी लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती चांदूर रेल्वे पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवी ३८०, ४६१ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश मुपडे करीत आहे. सदर तुर ही नाफेडची असल्याची माहिती मिळाली आहे.
११.५ कोटींचा माल तरीही निष्काळजीपणा 
सदर गोडाऊनमध्ये एकुण १९ हजार ९५९ पोते माल ठेवला असुन याची किंमत ११ कोटी ५० लाखांच्या घरात आहे. व यापैकीच ३१८ पोते तुर चोरीला गेली. एवढा माल ठेवला असतांना याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमलेला नसुन सि.सि.टी.व्ही. कॅमेराची सुध्दा व्यवस्था नाही. तसेच लावलेले कुलुप सुध्दा लहानच असल्याची माहिती मिळाली आहे. एकुणच म्हणजे कोटींचा माल असतांना सुध्दा संबंधितांनी निष्काळजीपणाच केल्याची चर्चा परिसरात ऐकावयास मिळत होती.