*Amravati Breaking :- जिल्हाधिका-यांकडून इर्विन चौकात बेशिस्तांवर कारवाई*

0
3718
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 24 : कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाललेली असतानाही मास्कचा वापर न करता बेपर्वाईने इतरांचेही आरोग्य धोक्यात आणणा-या बेजबाबदार नागरिकांना शिस्त लावण्यासाठी मोहिमच प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सकाळी स्वत: इर्विन चौकात थांबून बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली.

 

कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. दक्षता घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे कारवाईची वेळच येऊ देऊ नका, असे आवाहन वारंवार केले जात आहे. तरीही अनेक बेजबाबदार नागरिक मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे आढळून येत आहे. कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी अशा बेशिस्त नागरिकांना शिस्त लावणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी कारवाईची मोहिम प्रशासनाने हाती घेण्यात आली आहे.

त्याअंतर्गत जिल्हाधिका-यांसह त्यांच्या पथकाने स्वत: आज सकाळी इर्विन चौकात थांबून कारवाई केली. तहसीलदार संतोष काकडे, महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे, पोलीस निरीक्षक राहूल आठवले यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

घरोघर तपासणी व लोकशिक्षणासाठी माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी स्वच्छता, मास्क, सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा अवलंब झालाच पाहिजे. मात्र, वारंवार सांगूनही कुणी जर बेपर्वाईने वागून इतरांचे आरोग्य धोक्यात आणत असेल तर कारवाई करावीच लागेल. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न वापरणा-यांवर सर्वदूर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पोलीस, आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून जिल्हाभरात अशी मोहिम राबवली जात असल्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.

मास्क, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी दक्षता उपायांचा अवलंब न करणा-या व इतरांचे आरोग्य धोक्यात आणणा-या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यापूर्वीच दिले होते. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनीही दक्षतेचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामुळे कुणी जर दक्षता न घेता सार्वजनिक आरोग्याला हानी पोहोचवित असेल तर त्याविरुद्ध पोलीसांना कारवाईचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही दिले होते. त्यानुसार आता विविध विभागांच्या समन्वयाने अशा बेजबाबदार नागरिकांविरुद्ध जिल्ह्यात मोहिमच उघडण्यात आली आहे.

 

000