*मास्क न वापरणा-यांविरुद्ध पथकांची धडक मोहिम -एकाच दिवसात ५३ हजार दंड वसूल*

0
967
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 23 : कोरोना प्रतिबंध दक्षतेचा अवलंब न करणा-यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडून शहरात नियुक्त पथकांनी आज धडक मोहिम सुरू केली असून, एका दिवसात १६७ प्रकरणांत ५३ हजार ३०० रूपये दंड वसुली केली आहे.

मास्क, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी दक्षता उपायांचा अवलंब न करणा-या व इतरांचे आरोग्य धोक्यात आणणा-या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यासाठी विविध विभागांच्या अधिका-यांचा समावेश असलेल्या २० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी आज केलेल्या कारवाईत ५३ हजारांहून अधिक दंड वसुली झाली.

पथकांनी केलेल्या कारवाईदरम्यान विनामास्क फिरणा-या नागरिकांविरुद्धच्या १६१ प्रकरणांत एकूण ४८ हजार ३०० रूपये दंड वसूलण्यात आला. सोशल डिस्टन्स न पाळणा-यांवरील कारवाईच्या पाच प्रकरणात दीड हजार, तर रेटबोर्ड न लावलेल्या एका दुकानावरील कारवाईत ३ हजार रूपये दंड वसुली करण्यात आली.