*जिल्ह्यात प्रार्थनास्थळे खुली करण्यास परवानगी* _जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश जारी_

0
522
????????????????????????????????????
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १६ : प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळता जिल्ह्यातील शहरे, तसेच ग्रामीण भागातील सर्व धार्मिक स्थळे, पूजास्थाने उघडण्यास परवानगी देणारा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तथापि, कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत विविध उद्योग- व्यवसायांना चालना देत सार्वजनिक स्थळेही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहेत. आता धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशात ६५ वर्षावरील व्यक्ती, १० वर्षाखालील मुले, गर्भवती महिला यांनी घरातच राहण्याची सूचना करण्यात आली आहे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनानेही तशा सूचना जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स, मास्क आदी दक्षता घेणे हे धार्मिक स्थळाचे व्यवस्थापक, पुजारी, कर्मचारी, सेवेकरी, अभ्यागत व भाविकांवर बंधनकारक राहील. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था असावी. धार्मिक स्थळाच्या परिसरात थुंकण्यावर बंदी आहे. कोरोना किंवा तत्सम कुठलीही लक्षणे असलेल्या व्यक्तीला प्रवेश देऊ नये. कर्मचाऱ्यांत असे कुणी आढळले तर तत्काळ नजीकच्या यंत्रणेला कळवावे. भाविकांना पादत्राणे प्रार्थनास्थळाच्या आवारात न आणता वाहनात ठेवण्यास प्रवृत्त करावे किंवा सोशल डिस्टन्स राखले जाईल अशी व्यवस्था व्हावी.

*नो मास्क, नो एन्ट्री*
प्रार्थनास्थळे किंवा परिसरात कुठेही गर्दी होता कामा नये.
परिसरातील पूजा, प्रसाद, चहा, धार्मिक ग्रंथविक्री दुकाने आदी दुकानांतही सोशल डिस्टन्स ठेवले जाईल याची काळजी घ्यावी. धार्मिक स्थळी प्रार्थना संगीत वाजवता येईल, मात्र बाहेरून संगीतवृंद आणण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रार्थनेसाठी भाविकांनी सार्वजनिक चटईचा वापर करू नये, स्वतः ची स्वतंत्र चटई सोबत आणावी. प्रसाद, तिर्थवाटप करू नये. अन्नदान, लंगर आदी करावयाचे झाल्यास भौतिक अंतर पुरेसे राखले जावे. मास्क असल्याशिवाय धार्मिक स्थळी कुणालाही प्रवेश देऊ नये, असे आदेशात नमूद आहे.

०००