शहरातून वाहतुकीसाठी जड वाहनांना वेळ व मार्गांची मर्यादा :-  पोलीस आयुक्तांकडून अंतिम अधिसूचना जारी

0
553
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 17 :  शहरात वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने वेलकम टी पॉईंट ते अलमास गेट, बडनेरा दरम्यान जुन्या बायपासवर सर्व मालवाहू जड व हलक्या मालवाहू वाहनांना शहरात वाहतुकीसाठी वेळ व मार्गांची मर्यादा घालून देणारी अंतिम अधिसूचना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी आज जारी केली. जीवनावश्यक व अतिमहत्वाच्या सेवांना या अधिसूचनेतून वगळण्यात आले आहे.

अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात 2015 ते 2019 या काळात दोन हजार 564 अपघात झाले. त्यात 397 प्राणांतिक अपघात होते व 421 निष्पाप जीवांचा बळी गेला. हे लक्षात घेऊन शहरातील वाहतूक सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली. तत्पूर्वी याबाबत प्रस्तावित अधिसूचना निर्मगित करण्यात आली होती. त्याबाबत सन्माननीय लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी बांधव, ट्रक चालकमालक संघटना व परिवहन अधिकारी यांच्याशी चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. त्यांचे आक्षेप व सूचना लक्षात घेऊन अधिसूचनेला अंतिम रूप देण्यात आले.

अधिसूचनेनुसार, जड व मालवाहू वाहनांना ठराविक मार्ग वापरण्याचे बंधन घालून देण्यात आले असून, सकाळी 6 ते 8, सकाळी 10 ते दुपारी 2 व दुपारी साडेचार ते रात्री नऊ या वेळेत वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे.

यानुसार, बडने-याकडून जुन्या बायपासने अमरावती एमआयडीसीकडे येणा-या वाहनांना सकाळी 8 ते 10, दुपारी 2 ते साडेचार व रात्री नऊनंतर या वेळेदरम्यान एमआयडीसी कार्यालयापर्यंत येता येईल. पुढे येण्यास प्रतिबंध राहील. बडने-याच्या मालधक्क्याहून येणा-या जड वाहनांनी  बगिया टी पॉईंट येथून सुपर एक्स्प्रेस हायवेवर जाऊन गौरी-इन-रहाटगाव-रिंगरोड मार्गाचा अवलंब करावा.

बडने-याकडून सातुर्णा एमआयडीसीकडे येणा-या जड वाहनांना सकाळी 8 ते 10, दुपारी 2 ते साडेचार व रात्री नऊनंतर या वेळेदरम्यान रॉयल एनफिल्ड शोरूम येथून डावे वळण घेऊन केवळ सातुर्णा एमआयडीसीकडे जाता येईल. नवाथेकडे किंवा साईनगर ते सातुर्णा टी पॉईंटजवळील शीतल अपार्टमेंटच्या पुढे जाता येणार नाही. राजापेठ चौक ते बडनेरा पोलीस ठाणे या मार्गावर कोणतेही जड वाहन रस्त्यावर उभे राहता कामा नये.

चांदूर रेल्वे, कु-हा, मार्डी, भानखेडा मार्गे शहरात येणा-या जड वाहनांना सकाळी 8 ते 10, दुपारी 2 ते साडेचार व रात्री नऊनंतर या वेळेदरम्यान जुन्या बायपासने डावे व उजवे वळण घेऊन शहराबाहेर जाता येईल किंवा वेलकम टी पॉईंट, गौरी इन मार्गे रहाटगाव रिंगरोडचा वापर करून कठोरा जकात नाका, राजपूत धाबा, कठोरा नाका, शेगाव चौक मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत जाता येईल. मात्र, चपराशीपुरा चौक-सुंदरलाल चौक, बियाणी चौकाकडून कोर्ट चौकाकडे, दस्तूरनगर चौकाकडून कंवरनगर चौकाकडे जाता येणार नाही. चपराशीपुरा चौक ते दस्तुरनगर चौकादरम्यान सकाळी सहा ते रात्री नऊदरम्यान सर्व प्रकारच्या जड वाहतुकीला प्रतिबंध असेल. यवतमाळकडून येणा-या वाहनांना बगिया टी पॉईंट येथून सुपर एक्स्प्रेस हायवेला जाऊन रहाटगाव रिंगरोड मार्ग वापरता येईल.

बडने-याच्या रेल्वे मालधक्क्याहून धान्यवाहतूक करणा-या जड वाहनांना सकाळी 8 ते 10, दुपारी 2 ते साडेचार व रात्री नऊनंतर या वेळेदरम्यान बडनेरा जुना बायपासचा वापर करून बगिया टी पॉईंट, कोंडेश्वर टी पॉईंट मार्गे नवीन एक्स्प्रेसवेवर जाऊन रहाटगाव रिंगरोडमार्गे कठोरा जकात नाका,  शेगाव नाका, नवीन कॉटन मार्केट ते वेअर हाऊसपर्यंत जाता येईल किंवा कठोरा जकात नाक्याहून राजपूत धाबा, नवसारी रिंगरोड ते ट्रक टर्मिनलपर्यंत जाता येईल. ट्रान्सपोर्टनगर ते टांगा पडाव या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने उभे करण्यास मनाई आहे. भातकुली व लालखडीहून येणा-या मालवाहू वाहनांना विहित वेळेचे बंधन राहील.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याची वाहतूक करणा-या वाहनांना सकाळी 8 ते 10, दुपारी 2 ते साडेचार व रात्री नऊनंतर या वेळेदरम्यान रहाटगाव रिंगरोड, कठोरा नाका, शेगाव नाका या मार्गाचा व वलगावहून येणा-या वाहनांना राजपूत धाबा, कठोरा नाका, शेगाव नाका हा रस्ता वापरून बाजार समितीत जाता येईल.

वाळू, मुरूम, खडी, डांबर, मलबा, बोल्डर आदी वाहतूक करणा-या वाहनांना सकाळी 8 ते 10, दुपारी 2 ते साडेचार व रात्री नऊनंतर या वेळेदरम्यान शहरातून जुन्या बायपासचा वापर करता येईल, मात्र, गांधी चौक ते रविनगर, गांधी चौक ते राजापेठ, गांधीचौक ते अंबागेट मार्ग, बजरंग टेकडी ते विलासनगर पटवा चौक या मार्गावर वाहतूक करण्यास प्रतिबंध राहील.

शहरात प्रवेशबंदीनंतर वाहतूक करणा-या जड वाहनांना यवतमाळ टी पॉईंटच्या पुढे, भानखेडा जकात नाक्यापुढे, वडाळी जकात नाका, राजुरा जकात नाका, कठोरा जकात नाका, राजपूत धाबा, लालखडी, भातकुली जकात नाक्यापुढे थांबता येईल. मात्र, शहरात थांबता येणार नाही.

सक्करसाथेत किंवा कडबा बाजारात माल उतरवायचा झाल्यास अशा वाहनांना सकाळी 8 ते 10, दुपारी 2 ते साडेचार व रात्री नऊनंतर या वेळेदरम्यान रहाटगाव रिंग रोड मार्गे नवसारी, ट्रान्सपोर्टनगर, नागपुरी गेट चौक या मार्गाने वाहने आणता येतील. मात्र, माल तत्काळ उतरवून त्याच मार्गाने परत जाणे बंधनकारक आहे. सक्करसाथेपुढे जाता येणार नाही. टांगा पडाव ते ट्रान्सपोर्टनगरापर्यंत दोन्ही बाजूने वाहने उभी करता येणार नाहीत.

जड वाहनांना या मार्गांव्यतिरिक्त इतर रस्त्याने जाण्यास प्रतिबंध आहे.

सर्व प्रकारच्या हलक्या मालवाहू वाहनांना सकाळी 8 ते 10, दुपारी 2 ते साडेचार व रात्री नऊनंतर या वेळेदरम्यान शहरात वाहतुकीस परवानगी आहे. मात्र, आतील रस्त्यांवर वाहने अस्ताव्यस्त स्वरूपात उभी करता येणार नाहीत. जुन्या कॉटन मार्केटच्या पश्चिमेकडील भिंतीला लागून एका रांगेत अशी केवळ 20 वाहने उभी करता येतील.

                        ज्या जड वाहनांना अमरावती शहरात मालाची चढउतार करणे आवश्यक नाही, त्यांना संपूर्ण प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यांना केवळ सुपर एक्स्प्रेस वे व रिंगरोड वापरता येईल.

                                                वेगमर्यादा पाळा

            अधिसूचनेतील वेळेचे बंधन रविवारी व शासकीय सुट्टीच्या दिवशी लागू नसले तरी रमजान, गणेशोत्सव, दिवाळी आदी सणांच्या काळात अधिसूचना लागू असेल. रविवारी किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी जड व मालवाहू वाहनांना जुना बायपास, रहाटगाव रिंगरोज, कठोरा जकात नाका हा रस्ता वापरता येईल. सर्व जड वाहनांनी शहरात 20 ते 30 किमीची वेगमर्यादा पाळण्याचे आदेश आहेत.